"नील सोमय्यांचा 'बिनविरोध'चा फुगा फुटला
आता 'या' तगड्या उमेदवाराशी होणार थेट लढत !
मुंबई : खरा पंचनामा
राजकारणात शेवटच्या चेंडूवर काय होईल हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुलुंडमध्ये आलाय. भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून 'बिनविरोध' निवडून येणार, अशा वल्गना सुरू झाल्या होत्या.
विरोधकाचा अर्ज बाद झाल्याने भाजप गोटात जल्लोष सुरू होता. मात्र, संजय राऊत यांनी ऐनवेळी असा एक 'गुगली' टाकलाय की सोमय्या पिता-पुत्राचं टेन्शन चांगलंच वाढलंय.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला असला, तरी तिथे आता शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरला आहे. दिनेश जाधव असं या उमेदवाराचं नाव असून, राऊतांनी त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. "मुलुंडचे 'ना* * पोपटलाल' स्वतःला बिनविरोध समजून नाचत आहेत, पण आता खरी लढाई होणार," असा सणसणीत टोला राऊतांनी लगावला आहे. दिनेश जाधव यांना 'मशाल' चिन्ह मिळालं नसलं, तरी ते 'दूरदर्शन संच' या चिन्हावर निवडणूक लढवतील आणि त्यांना ठाकरे गटाची पूर्ण ताकद मिळेल.
किरीट सोमय्यांवर तोफ डागताना राऊत म्हणाले, "किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. त्यांनी मराठी सक्तीला विरोध केला, मराठी उद्योजकांना त्रास दिला. हे भ्रष्टाचारी भाजपमध्ये गेल्यावर यांचं तोंड शिवलं गेलं." इतकंच नाही तर, जिथे जिथे उमेदवार मागे घेतले गेले, तिथे पैशांचा खेळ झाल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला. "कल्याणमध्ये ५० कोटी, तर इथे ५ कोटी... खोकी आणि पेट्यांचा वापर करून माघार घ्यायला लावली," असा खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.
आता मुलुंडच्या १०७ वॉर्डात 'बिनविरोध'चा फुगा फुटला असून, नील सोमय्या विरुद्ध दिनेश जाधव असा 'काटे की टक्कर' होणार हे निश्चित झालंय. त्यामुळे सोमय्यांच्या बालेकिल्ल्यात राऊतांचा हा डाव किती यशस्वी ठरतो, हे पाहणं रंजक ठरेल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.