बोलवाडमधील बेवारस महिलेच्या मृतदेहाचे रेल्वेच्या तिकिटावरून गूढ उकलण्यात यश
उत्तरप्रदेशमधील पती, सासऱ्याला खूनप्रकरणी अटक : सांगली एलसीबी, मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
मिरज तालुक्यातील बोलवाड येथील टाकळी ते मल्लेवाडी रस्त्यावरील ऊसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या रेल्वेच्या तिकिटावरून तिचा खून झाल्याचे उघडकीस आले. चरित्र्याच्या संशयावरून अत्यंत नियोजनबध्दरित्या पती आणि सासऱ्याने शालीने गळा आवळून महिलेचा खून केल्याचे स्पष्ट झाले. एलसीबी आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी ही कामगिरी केल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नितू उर्फ शालीनी आकाश यादव (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव (वय २४) आणि सासरा दीनदयाळ रामबाली यादव (वय ५५, दोघेही रा. खुज्झी, ठाणा चंन्दवक, जि. जौनपुर, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २३ डिसेंबर रोजी कुमार पाटील यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाचा डोक्याकडील भाग प्राण्यांनी खाल्ल्याने आणि तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटविणे अवघड होते. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. परिस्थितीजन्य पुरावे काहीच नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान होते. अधीक्षक घुगे यांनी याचा समांतर तपास एलसीबीकडे सोपविला होता. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना घटनास्थळावर इम्रान मुल्ला, प्रमोद साखरपे यांना पुणे ते मिरज दरम्यानचे रेल्वे तिकीट सापडले. ते तिकीट दि. १६ डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढले असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तातडीने मिरज रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मृत महिलेने घातलेली साडी आणि तिने पांघरलेली शाल असणारी एक महिला आणि दोन पुरुष सीसीटिव्हीत कैद झाले. सदर फुटेज पोलिसांनी स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक, फेरीवाले व हमालांना दाखविले. रेल्वे स्थानकावरील एका चिक्की विक्रेत्याने सदर महिला आणि दोन पुरुषांना ओळखले. त्याने पोलिसांना, तिघांकडे पैसे नसल्याने या तिघांपैकी एकाने नातेवाईकांकडून फोनपेवरून मागविलेली ३ हजारची ऑनलाइन रक्कम आपल्याला दिल्याची माहिती दिली. तसेच एका रिक्षा चालकाने तिघांना टाकळी गावाजवळील ओढ्याजवळ सोडल्याचे सांगितले. रिक्षामध्ये महिलेसमवेत दोन्ही पुरुषांचा सतत वाद सुरु असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली.
एलसीबीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक तपास केला असता त्यांना दोन संशयित मोबाईल क्रमांक निष्पन्न झाले. सदर क्रमांक उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील असल्याचे समजले. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलीस पथके उत्तर प्रदेश व हरियाणा येथे रवाना झाली. सीसीटीव्हीतील व्यक्ती आकाश ऊर्फ विशाल दीनदयाल यादव आणि दीनदयाल रामबाली यादव असल्याचे समजले.
खून करण्यात आलेली महिला नितू हिचे आरोपी आकाश यादव याच्यासमवेत दुसरे लग्न झाले होते. तीला एक अपत्य आहे. लग्नानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरुन सतत वाद होत होते. काही महिन्यांनी मृत नितूच्या दुसऱ्या लग्नाचा प्रकार पती आकाश यास समजला. घरातील कामे करीत नसल्यामुळे सासरच्या मंडळीसमवेत मृत नितू हिचा वाद होत होता. वारंवार वाद होत असल्यामुळे ती माहेरी जावून राहिली होती. जेव्हा मृत नितू सासरी होती त्यावेळी ती वेळी - अवेळी फोन वरुन कोणाशी तरी बोलत असायची. त्यामुळे तिच्या चारित्र्याबाबत पती आकाश यास संशय होता. त्यामुळे तिचा काटा काढायचा निश्चय पती आकाश आणि सासरा दीनदयाळ यांनी केला. पोलीस तपासात कौटुंबिक वादातून नितू हिने चंंदवक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे उघड झाले. आकाश याने पोलीस ठाण्यात जावून तेथील पोलिसांना, आम्ही पती - पत्नी अन्यत्र ठिकाणी राहण्यास जात असल्याचे सांगून नितूला तक्रार मागे घेण्यास लावली होती.
दरम्यान नितूला संपवायचे या उद्देशानेच पती आकाश आणि सासरा दीनदयाळ या दोघांनी नितू हिला दुसरीकडे राहण्यास जाण्यासाठी जागा बघून येवू असे सांगितले. याकरिता ते तिघे उत्तर प्रदेश येथील मिर्झापूर रेल्वे स्थानकावर आले. तेथून ते पुण्याला आले. त्यानंतर दि. १६ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तिघे मिरज रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून ते रिक्षाने टाकळी येथील ओढ्याजवळ गेले. रिक्षा निघून गेल्यानंतर ऊसाच्या शेतात नेऊन दोघांनी संगनमताने शालीने गळा आवळून नितू उर्फ शालिनी यादवचा खून केला. मृतदेह शेतात टाकून काही वेळाने दोघेही पुन्हा मिरज रेल्वे स्थानकातून उत्तर प्रदेशकडे पसार झाले.
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक रणजित तिप्पे यांनी केलेल्या चौकशीत खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषणने समांतर तपास सुरुच ठेवला होता. दोन्ही पोलिसांनी केलेल्या संयुक्त तपासात अखेर चारित्र्याच्या संशयावरुन महिलेचा खून केल्याचे समोर आले. या कारवाईत पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर आणि पोलीस उपअधिक्षक प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरिक्षक संजीव झाडे, मिरज ग्रामीणचे पोलीस निरिक्षक अजित सिद, सहायक निरीक्षक रणजीत तिप्पे, एलसीबीचे उपनिरिक्षक कुमार पाटील आणि महादेव पोवार, प्रमोद साखरपे, इम्रान मुल्ला, सुशील मस्के, श्रीधर बागडी, अतुल माने, गणेश शिंदे,सुनील देशमुख, सायबर पोलीस ठाण्याचे अभिजीत पाटील, अजय पाटील आदींनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.