प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथावर 'गणेशोत्सवा'चा देखावा
नवी दिल्ली : खरा पंचनामा
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दर्शविले जाणार आहे. यंदाच्या संचलनासाठी महाराष्ट्रातर्फे 'गणेशोत्सव- आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनामध्ये गणेशोत्सवावरील आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन देर लेयेन हे प्रमुख पाहुणे असतील. त्यांच्यासमोर गणेशोत्सवाच्या चित्ररथाद्वारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव उलगडले जाणार आहे.
राज्य सरकारने मागील वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सव' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असून, या उत्सवामुळे केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळते, हे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.
चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला एक भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपारिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्रीशक्तीचे दर्शन घडवेल. चित्ररथाच्या मध्यभागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभक्त दर्शवण्यात आला आहे.
चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिरांची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, इतर सांस्कृतिक बाबींचेही बारकाव्यांसह दर्शन घडवण्यात आले आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक असेल.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून सुरू केलेली चळवळ आधुनिक भारताला कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.