ऐनवेळी बदलले पायलट, अनुभवी कॅप्टन असूनही अपघात कसा झाला?
विमान दुर्घटनेमागचं गूढ वाढलं : सीआयडी चौकशी सुरु
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बुधवारी सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ येताच अचानक खाली कोसळले.
दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह अंगरक्षक विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं केवळ एक राजकीय नेते नाही, तर अनेक कुटुंबांचा आधार हिरावून घेतला.
काल गुरुवारी दुपारी १२ वाजता बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पवार कुटुंबीयांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध पक्षांचे नेते, राजकीय कार्यकर्ते, सेलिब्रिटी, बारामतीकर नागरिक आणि राज्यभरातून आलेले हजारो चाहते उपस्थित होते. 'दादांच्या जाण्याने प्रत्येकाचं मन भरून आलं होतं, अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली होती.
दरम्यान, या भीषण विमान अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली असून त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान मूळतः दुसऱ्या पायलटने उडवायचं होतं. संबंधित विमान कंपनीने बारामतीच्या उड्डाणासाठी वेगळ्या वैमानिकाची नियुक्ती केली होती. मात्र तो वैमानिक वाहतूक कोंडीत अडकला आणि वेळेत विमानतळावर पोहोचू शकला नाही. अजित पवार यांचा कार्यक्रम आणि वेळेची निकड लक्षात घेता, ऐनवेळी ही जबाबदारी कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर सोपवण्यात आली.
कॅप्टन सुमित कपूर हे नवखे वैमानिक नव्हते. त्यांना सुमारे १५ हजार तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता. त्यांच्या मित्र जी. एस. ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित कपूर अत्यंत शांत, शिस्तप्रिय आणि अनुभवी पायलट होते. त्यांच्या हातून तांत्रिक किंवा मानवी चूक होण्याची शक्यता फारच कमी होती. विशेष म्हणजे, या उड्डाणाची माहिती त्यांना अवघ्या काही तास आधी देण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ते हाँगकाँगहून भारतात परतले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
या सर्व घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अनुभवी पायलट असूनही अपघात कसा झाला? विमानात काही तांत्रिक बिघाड होता का? उड्डाणापूर्वी आवश्यक तपासणी पूर्ण झाली होती का? की हा केवळ एक दुर्दैवी योगायोग होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच मिळणार आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली असून राज्य सरकारने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.