राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात गेलेले ७ नगरसेवक अपात्र
रायगड : खरा पंचनामा
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या 'साहेब' विरुद्ध 'शेठ' असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जोरदार धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या म्हसळा नगर पंचायतीतील सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसला आहे.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या सात नगरसेवकांनी पक्षांतर करत शिंदे गटाची वाट धरली होती. या पक्षांतरामुळे म्हसळ्यातील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का बसला होता. मात्र, सुनील तटकरे यांनी कायदेशीर लढाई लढत या नगरसेवकांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेचा अर्ज दाखल केला होता. या सुनावणीत अखेर तटकरेंच्या रणनीतीचा विजय झाला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचे बळ घटले आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी 'महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६' मधील कलम ३(२) आणि १९८७ च्या नियम ८ (१) मधील तरतुदींनुसार हा निकाल दिला. पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्याने या सर्व सातही सदस्यांचे पद रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.