गृह खात्याच्या सचिवाला फडणवीस सरकारकडून राज्यमंत्र्याचा दर्जा
मुंबई : खरा पंचनामा
ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल येत्या 31 जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्याकडे पुढील नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चहल यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर ते लगेचच या पदाची सुत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे. या पदासह त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जाही देण्यात येणार आहे. चहल यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले असून त्यांना प्रशासनात काम करण्याचा 36 वर्षांचा अनुभव आहे.
राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 45 हजार सरकारी निवासस्थाने बांधण्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही टाऊनशिप बांधली जाणार असून यात 5 कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. यासाठी 20 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 30 टक्के निधी सरकार तर 70 टक्के निधी एमएसआयडीसीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडन कर्ज म्हणून घेतला जाणार आहे. सध्या प्रकल्प सुरू करण्यासाठी महामंडळाला 100 कोटींचा प्राथमिक निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
सध्याच्या सरकारमध्ये निवृत्तीनंतर मंत्रिपदाचा दर्जा मिळवणारे ते दुसरे सनदी अधिकारी ठरणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी प्रवीण परदेशी यांना हा मान मिळाला आहे. परदेशी यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुदत 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार होती. पण त्यांना या पदावर आणखी 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
याशिवाय मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षही आहेत. याआधीही ठाकरे सरकारने सीताराम कुंटे यांनाही निवृत्तीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे सरकार कुठलेही असले तरी ते अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधत असते हेही तितकेच खरे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.