काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला
अकोला : खरा पंचनामा
राज्यात महापालिका निवडणुकींचा रणसंग्राम पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी वादाचे फटाके देखील फुटले आहेत. सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याची घटना घडली. सोलापूरमधील मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येची घटना ताजी असताना अकोल्यात मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याने अकोल्यात खळबळ उडाली आहे.
अकोल्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अकोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या मोहाळा गावात त्यांच्यावर मंगळवारी जीवघेणा हल्ला झाला. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
हिदायत पटेल 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार होते. हिदायत पटेल सध्या काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहेत.
तत्पूर्वी, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत हिदायत पटेल यांनी काँग्रेस पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याचा अकोट नगरपालिकेतील काँग्रेसच्या नगराध्यक्ष उमेदवार अलका बोडके यांनी आरोप केला होता. हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी पोलिसांचा तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.