Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

मद्यधुंद वैमानिकाला कॅनडात अटक; एअर इंडियाच्या विमानात मोठा राडा

दिल्ली : खरा पंचनामा 

आकाशात शेकडो प्रवाशांचा जीव ज्याच्या हातात असतो, त्याच वैमानिकाने बेजबाबदारपणाचा कळस गाठल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॅनडातील  व्हॅकुव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाच्या एका वैमानिकाला मद्यधुंद अवस्थेत असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलांनी विमानातून खाली उतरवून ताब्यात घेतले. या घटनेमुळे व्हॅकुव्हर ते दिल्ली या विमान प्रवासाला दोन तासांचा विलंब झाला, मात्र एका ड्युटी-फ्री कर्मचाऱ्याच्य सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येण्यापासून वाचला आहे.

ही घटना २३ डिसेंबर २०२५ रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचा हा वैमानिक ड्युटीवर जाण्यापूर्वी विमानतळावरील ड्युटी-फ्री स्टोअरमध्ये गेला होता. तिथे तो केवळ दारूची बाटली विकत घेत नव्हता, तर काही बाटल्यांमधील दारू 'टेस्ट' करत होता. स्टोअरमधील एका कर्मचाऱ्याला वैमानिकाच्या तोंडातून दारूचा उग्र वास आला. कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता सुरक्षा अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वैमानिकाचा माग काढला असता, तो विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेला आढळला.

कॅनेडियन सुरक्षा अधिकाऱ्यांनी वैमानिकाला विमानातून बाहेर काढले आणि त्याची ब्रेथअलायझर चाचणी  केली. या चाचणीत वैमानिकाने विहित मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. उड्डाण करण्यासाठी तो पूर्णपणे अयोग्य असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने ताब्यात घेण्यात आले. एअर इंडियाने या घटनेची तत्काळ दखल घेत संबंधित क्रू मेंबरवर निलंबनाची कारवाई केली आहे.

वैमानिकाला ताब्यात घेतल्यामुळे विमानाचे टेकऑफ थांबवण्यात आले. यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर एअर इंडियाने तातडीने दुसऱ्या वैमानिकाची व्यवस्था केली. हे विमान प्रथम व्हिएन्ना येथे उतरले, जिथे नवीन क्रूने जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर प्रवाशांना दिल्लीला आणण्यात आले. एअर इंडियाने या प्रवासादरम्यान झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे, परंतु वैमानिकाच्या या वागणुकीमुळे एअरलाइनच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे.

भारतातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, वैमानिकाने उड्डाणाच्या १२ तास आधी कोणत्याही प्रकारचे मद्यप्राशन करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणात वैमानिकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाण्याची दाट शक्यता आहे. दोषी वैमानिकाला दिल्लीत आणण्यात आले असून त्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.