बंटी जहागिरदार खून प्रकरण, दोन्ही मुख्य आरोपींच्या आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर : खरा पंचनामा
अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. दोन जणांनी दुचाकीवरून येत जहागीरदारवर गोळ्या झाडल्या. एवढ्या मोठ्या प्रकरणातील हायप्रोफाईल आरोपीची अशाप्रकारे हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
गुरुवारी दोघांना कोपरगाव हद्दीतून अटक करण्यात आली आहे. जिल्हाभर करण्यात आलेल्या कडक नाकाबंदीमुळे आरोपींना पळून जाण्यात अपयश आलं आहे. बंटी जहागीरदारवर गोळीबार झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अहमदनगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही नाकाबंदीचे आदेश देण्यात आले होते. आरोपी रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे हे दोघे कोपरगावमार्गे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी बंटी जहागीरदारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मयत बंटी जहागीरदारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी बुधवारी बंटी जहागीरदार कब्रस्तानमधून आपल्या घरी परत होते. यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी अचानक येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. रस्त्यावर गर्दी असतानाही आरोपींनी हा हल्ला केला. हल्ल्यानंतर तातडीने जहागीरदारला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.