"आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार"
मुंबई : खरा पंचनामा
महानगरपालिकेसाठी राज्यभरात आज मतदान सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेतील पारदर्शकतेवर बॉम्ब टाकला आहे. मार्कर पेनचा वापर हाच विकास आहे का? निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या मतदानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक व्यवस्थेवर जोरदार टीका केली. "कसाही मार्ग वापरून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत", असा आरोप करत त्यांनी मतदार याद्या, मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत तब्बल दहा लाख दुबार मतदार आढळून आले आहेत. काही ठिकाणी मतदारांची नावे पुसली जात असल्याचे प्रकार समोर येत असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय निर्माण झाला आहे. संपूर्ण प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले बनले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आपण सतर्क राहून बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे.
मतदान प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला. मतदानानंतर वापरली जाणारी शाई न वापरता मार्कर पेनचा वापर केला जात आहे, असा दावा करत त्यांनी यावर आक्षेप घेतला. "शाई पुसून पुन्हा मतदान करता येत असेल, तर हाच विकास आहे का?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मतदान आणि मतमोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या 'पाडू' नावाच्या यंत्रावरही राज ठाकरे यांनी शंका व्यक्त केल्या. हे यंत्र कोणत्याही राजकीय पक्षाला प्रत्यक्ष दाखवण्यात आलेले नाही, तसेच VVPAT चा प्रयोग का केला जात नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतमोजणीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणांवर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित करत संपूर्ण प्रणालीवरच बोट ठेवले. जाता जाता राज ठाकरे यांनी आम्हाला काय करायचं ते आम्ही करणार असं म्हणून भाजपला इशारा दिला आहे.
राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, प्रशासनाची भूमिका आणि सत्तेचा गैरवापर यावर नव्याने चर्चा सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.