'दादां'चा तो शेवटचा शब्द अन् बारामतीतील 'त्या' ४ सभांचे अधुरे स्वप्न !
बारामती : खरा पंचनामा
ज्या बारामतीच्या मैदानातून राज्याच्या राजकारणाची सूत्रे हलवली जातात, त्याच बारामतीच्या मातीत आज एक अघटित घडले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजच्या दिवशी बारामतीमध्ये झंझावाती प्रचाराचे रणशिंग फुंकणार होते. सभेची मैदाने सजली होती, लाऊडस्पीकरवर 'दादां'च्या आगमनाच्या घोषणा होत होत्या, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
अजित पवार हे केवळ नावाचेच 'वेळ पाळणारे' नेते नव्हते, तर आजच्या दौऱ्याचे नियोजनही त्यांनी मिनिटा-मिनिटाच्या हिशोबात आखले होते. काल रात्री उशिरापर्यंत मंत्रालयात 'पायाभूत सुविधा समिती'ची बैठक घेऊन त्यांनी मुंबईच्या विकासाचे अनेक मार्ग मोकळे केले होते. त्यानंतर आज सकाळी ८ वाजता त्यांनी बारामतीतील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रस्थान केले होते.
बारामतीतील सुपे येथे जेव्हा सभा सुरू होण्याची वेळ झाली, तेव्हा हजारो कार्यकर्ते तिथे जमले होते. मात्र, काही वेळातच विमान अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सभेच्या उत्साहाचे रूपांतर आक्रोशात झाले. ज्या मंचावरून दादा विरोधकांचा समाचार घेणार होते, त्याच मंचावरून त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी सांगावी लागली, हा बारामतीसाठी सर्वात मोठा दुर्दैवी क्षण ठरला.
अजित पवारांच्या या दौऱ्यातून महायुतीला मोठी ताकद मिळणार होती. मात्र, आजच्या या दुर्दैवी घटनेने राज्याच्या राजकारणातील एक धगधगता ज्वालामुखी शांत झाला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत 'लोकांसाठी काम' करण्याची जिद्द उराशी बाळगून निघालेल्या या लोकनेत्याचा प्रवास बारामतीच्या वेशीवरच थांबला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.