नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग, तपासात पोलिसांना सापडली चिठ्ठी?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नितेश राणे यांच्या घातपाताचा प्रयत्न झाल्याचा संशय निर्माण झाल्याने आता पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. बेवारस बॅग आढळून आल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली अन् सुरक्षा यंत्रणेने बॅगचा ताबा घेतला. त्यानंतर त्यावर एक चिठ्ठी देखील सापडली.
मंत्री नितेश राणे यांच्या सुवर्णगड बंगल्याच्या बाहेर सापडलेल्या बॅगवर पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीमध्ये या बॅगमध्ये बूट आणि कपडे आहेत ते तुम्ही मोफत घेऊ शकता, असा संदेश लिहिलेला होता. सीसीटीव्हीत एक तरुण बॅग ठेवून जाताना दिसल्याने पोलीस घटनास्थळी तातडीने रवाना झाले. पोलिसांकडून बॅगची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे हा तरुण कोण होता? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
मागील अनेक वर्षांपासून मंत्री नितेश राणे हे हिंदुत्ववादी भूमिका आक्रमक पद्धतीने मांडताना पाहायला मिळत आहे. नितेश राणेंची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच अशा प्रकारची बेवारस बॅग त्यांच्या घरामुळे घराबाहेर सापडल्याने संशय व्यक्त केला जात आहे. हा घातपाताचा प्रकार आहे का? याबाबत पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. आता पोलिसांच्या तपासणीत नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्या हिंदुत्ववादी प्रचार पॅटर्नमुळे त्यांना धमकावण्याचे प्रकार घडले होते. यातच अनेक ठिकाणी झालेल्या हिंदुत्ववादी वादग्रस्त भाषण स्टाईलमुळे नितेश राणे चर्चेत आले होते. सध्या मुंबईत महापालिका निवडणुकीचा प्रचार जोमात आहे. निवडणुकीच्या काळातच असा प्रकार घडल्याने याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.