सांगली महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांवर खुनीहल्ला
चाकू बरगडीत अडकल्याने प्रकृती गंभीर : दोन संशयितांचा शोध सुरु
सांगली : खरा पंचनामा
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील कृष्णा माळी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच खुनीहल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. चाकू माळी यांच्या बरगडीत अडकल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना आज मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कलानगर येथे घडली. घटनेनंतर शहर पोलिसांसह एलसीबीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस त्या दोन संशयितांचा शोध घेत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
हल्ल्यानंतर माळी यांच्या मित्रांनी टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. सुनील माळी हे कुटुंबीयांसह कलानगर येथे राहतात. महापालिकेचे ते मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून काम करतात. माळी दिवसभर कामावर होते. सायंकाळी ते मित्रासोबत दुचाकीवरून घरी निघाले होते. यावेळी बायपास रस्त्यावर त्यांनी चहा घेतला. नंतर ते मित्रासह कलानगर येथील घराकडे गेले. यावेळी त्यांच्या घराजवळ दुचाकीवरून आलेले दोन हल्लेखोर दबा धरून बसले होते. माळी हे दुचाकीवरून उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या चाकने पोटात उजव्या बाजूला तसेच पाठीवर वार केले. वार इतका वर्मी होता की तो चाकू अडकून बसला. माळी यांच्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर संशयित हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.
माळी यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने टिंबर एरियातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी अति दक्षता विभागात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना इनाम धामणी रोडवरील एका रुग्णालयात नेण्यात आले. याठिकाणी अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या मुख्य अधिकाऱ्यावरच खुनीहल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
हल्ल्याची माहिती मिळताच आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील , उपायुक्त अश्विनी पाटील यांच्यासह उपअधीक्षक प्रणील गिल्डा, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव, शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्यासह पोलीस पथकांनी रुग्णालयात धाव घेतली होती.
तीन महिन्यापूर्वीही झाला होता हल्ला
सुनील माळी यांच्यावर तीन महिन्यांपूर्वी अज्ञातांनी काठीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ही घटना ताजी असतानाच त्यांच्यावर पुन्हा खुनी हल्ला झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.