"इतिहासाची पानं पलटली तर बोलताही यायचं नाही"
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या कारभारावर बोट ठेवत स्थानिक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मात्र त्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी 'आम्ही पुस्तकाची मागील पानं पालटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही' असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केलाय.
पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरं खरं तर पवारांचा बालेकिल्ला. परंतु २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दोन्ही शहरांवर कब्जा मिळवला. राष्ट्रवादीच्या ताब्यातून दोन्ही महापालिका हिसकावून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला. बालेकिल्ला हातून गेल्याची रूखरूख अजित पवार यांना लागून राहिली आहे. आता तोच बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी अजित पवार कंबर कसून कामाला लागले आहेत. याची सुरुवात त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून केली. मात्र हीच गोष्ट भाजपला खटकली आहे.
आमच्यावर आरोप करणाऱ्या अजित पवार यांनी 'खुद के गिरेबान में झाँक कर देखना चाहिए...' अशा शब्दात पहिल्यांदा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. या इशाऱ्यानंतरही अजित पवार यांनी आरोपांची माळ सुरूच ठेवल्याने बावनकुळे मैदानात उतरले. आम्ही जर इतिहासाची पानं पलटली तर अजित पवार यांना बोलणंही मुश्किल होईल, अशी थेट धमकीच बावनकुळेंनी दिली.
भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाच्या समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे अजित पवार यांनी बोलावे, अन्यथा बोलण्यासारखे बरेच काही आहे, असा निर्वाणीचा इशारा देखील बावनुकळे यांनी दिला. दरम्यान, ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप असून मी सत्तेत बसतो हे सांगणे म्हणजे अभिमानाची बाब नाही, असे म्हणत प्रकरण अजून न्यायालयात आहे, निकाल आल्यावर बघू, अशी आठवण करून देत तुम्हाला कधीही कोंडीत पकडू शकतो, असेच बावनकुळे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.