उमेदवारी फॉर्म देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना महसूल सहायकाला अटक
सांगली एसीबीची कवठेमहांकाळ येथे कारवाई
सांगली : खरा पंचनामा
पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी फॉर्म देण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना महसूल सहायकाला रंगेहात पकडून अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
सुभाष बाबासो पाटील, (वय ५४, रा. इरळी ता. कवठेमहांकळ जि. सांगली) असे अटक केलेल्या महसूल सहायकाचे नाव आहे. तक्रारदार यांची पत्नी कवठेमहांकाळ पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी उमेदवारीचे फॉर्म घेण्यासाठी ते तहसील कार्यालयात मंगळवारी गेले होते. त्यावेळी संशयित पाटील यांनी एका फॉर्मचे शंभर रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी याबाबत सांगली एसीबीकडे तक्रार दिली होती.
तक्रारीची पडताळणी करून बुधवारी पथकाने सापळा रचला. त्यावेळी तक्रारदारांनी त्यांच्याकडून दोन फॉर्म घेतले. त्याचे दोनशे रुपये घेतले. त्याची कोणतीही पावती दिली नाही. यावेळी एसीबीच्या पथकाने संशयित पाटील यांना रंगेहात पकडले.
एसीबीच्या सांगलीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, किशोरकुमार खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, सलिम मकानदार, सुदर्शन पाटील, सीमा माने, सागर नायकुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.