सायबर फसवणूक प्रकरण : मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक
प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी
भाईंदर : खरा पंचनामा
ज्येष्ठ भारतीय पोलीस प्रशासनातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमर सिंह चहल यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची गंभीर घटना समोर आली असून, सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उघडकीस आलेल्या सायबर फसवणूक प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात मिरा-भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर आणि त्याच्या इतर साथीदारांनी मोठ्या प्रमाणावर सायबर फ्रॉड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात तपासासाठी पंजाब पोलीस नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, चौकशीअंती काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात शेरा ठाकूर व संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची रक्कम वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
याच प्रकरणात शेरा ठाकूरचा एक साथीदार ताब्यात घेण्यात आला असून, पूर्वी पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला 'पांडे' नावाचा बुकीही या टोळीचा भाग असल्याची माहिती समोर येत आहे. पांडे हा सट्टेबाजी प्रकरणात यापूर्वीही संशयित राहिलेला असून, त्याचा या सायबर फसवणूक प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा संशय आहे.
दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात काही व्यक्ती क्रिकेट सट्टा व अन्य बेकायदेशीर सट्टेबाजी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकरणांचा सखोल तपास झाल्यास आणखी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांकडून आर्थिक व्यवहार, बँक खाती आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल छडा लावला जात असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकरणावर शिवसेना नेते व राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. "असे अपराधी जर मिरा-भाईंदर शहरात राहत असतील तर त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. अशा लोकांमुळे शहराचं नाव खराब होतं. तसेच जे राजकीय नेते व कार्यकर्ते त्यांच्या सोबत फिरतात, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे," अशी स्पष्ट मागणी सरनाईक यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमर सिंह चहल यांनी सोमवारी पटियाला येथील त्यांच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच कुटुंबातील सदस्यांनी धाव घेतली आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.