Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन झालं सुन्न; कर्मचाऱ्यांचा बांध फुटला !

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील 'ते' दालन झालं सुन्न; कर्मचाऱ्यांचा बांध फुटला !

मुंबई : खरा पंचनामा

ज्यांच्या एका शब्दावर अख्खं मंत्रालय पळायचं, ज्यांच्या जरबेने बडे-बडे अधिकारी फाईल घेऊन येताना दहावेळा विचार करायचे, त्या अजित पवारांच्या निधनाने आज केवळ राजकारणच नाही, तर त्यांचा कर्मचारी वर्गही कोलमडून पडला आहे. "दादा म्हणजे केवळ एक नेते नव्हते, तर ते आम्हाला शिस्त लावणारे आणि आमची काळजी घेणारे घरातील कर्ते पुरुष होते," अशा शब्दांत त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

"दादांचा वक्तशीरपणा आणि स्वच्छता म्हणजे एक आदर्श होता. सकाळी आठला बैठक म्हणजे आठलाच सुरू व्हायची. बैठकीत कोणाची नेमप्लेट कशी आहे, पाण्याची बाटली योग्य जागी आहे का, इथपासून दादांचं बारीक लक्ष असायचं. ऑफिसमध्ये कागदाचा कपटा दिसला तरी ते स्वतः वाकून उचलायचे आणि मग संबंधित कर्मचाऱ्याला झापायचे. त्यांच्याकडे इतका दांडगा अनुभव होता की, एखाद्या फाईलवर त्यांनी वर्षापूर्वी काय सही केली होती किंवा काय शेरा दिला होता, हे त्यांना तोंडपाठ असायचं. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसासोबत काम करायला मिळालं, हे माझं भाग्य आहे," असे एकाने सांगितले.

"दादा लोकांसाठी राजा होते. ते कधीच सामान्य नेत्यांसारखे वागले नाहीत. लोकांचं कोणतंही काम असो, ते तडीस नेल्याशिवाय ते शांत बसायचे नाहीत. विशेष म्हणजे, कामाचा डोंगर असतानाही आमच्यासारख्या छोट्या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याकडे दादांचं बारीक लक्ष असायचं" असे त्यांच्या स्टाफमधील एकजण म्हणाला.

"दादांचा प्रशासनावर असलेला दरारा संपूर्ण देशाला माहित आहे. आज कार्यकर्ते टाहो फोडत आहेत की 'दादा परत या', पण हे शक्य नाही. दादांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती महाराष्ट्र कधीच भरून काढू शकणार नाही. एक उत्तम मंत्री आणि नेता तर गेलाच, पण आमच्यासाठी 'दादा' नावाचा एक बापमाणूस हरवला आहे, याची खंत आयुष्यभर राहील," अशा भावना एका कर्मचाऱ्याने व्यक्त केल्या.

अजितदादांच्या कार्यालयात काम करणं म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकणं असायचं. कोणताही अधिकारी दादांच्या बैठकीला येताना पूर्ण माहितीनिशी यावा लागायचा, कारण दादांना कोणीही चुकीची माहिती देऊन फसवू शकत नव्हतं. शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकी या त्रिवेणी संगमामुळेच दादा मंत्रालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वांचे लाडके होते. आज मंत्रालयातील प्रत्येक दालन दादांच्या त्या कडक शिस्तीची आणि आश्वासक आवाजाची वाट पाहत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.