Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' प्रकरणात आर्यन खानला उच्च न्यायालयाचा दिलासा; समीर वानखेडेंची याचिका फेटाळली

'त्या' प्रकरणात आर्यन खानला उच्च न्यायालयाचा दिलासा; समीर वानखेडेंची याचिका फेटाळली

दिल्ली : खरा पंचनामा

आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना दिल्लीउच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान दिग्दर्शित "बॅड्स ऑफ बॉलिवूड" या वेब सीरिजवर त्यांची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने आज (दि.29) हा खटला फेटाळून लावला आहे.

समीर वानखेडेंनी आर्यन खान दिग्दर्शित वेब सीरिजमध्ये आपली प्रतिमा मलिन करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांच्या मते, या सीरिजमधील काही दृश्यांमधून त्यांचा अप्रत्यक्षपणे अपमान करण्यात आला. या पार्श्वभूमीवर वानखेडेंनी दिल्लीउच्च न्यायालयात शाहरुख खान, गौरी खान, नेटफ्लिक्स इंडिया आणि रेड चिलीजविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.

समीर वानखेडेंनी या खटल्यात 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई, तसेच सीरिजमधून ड्रग्स केसशी संबंधित कंटेंट तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. या रकमेचा वापर टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा दावा त्यांनी केला होता.

वानखेडेंनी सीरिजमधील एका सीनवर विशेष आक्षेप घेतला होता. या दृश्यात एक नार्कोटिक्स अधिकारी नशा करत असलेल्या डीजेजवळ जातो, नंतर तो एका तरुणाकडे इशारा करत म्हणतो की, "तो स्टार किड नाही" आणि मस्ती करत असलेल्या त्या स्टार किडला ताब्यात घेतो. या दृश्यातून आपल्याला लक्ष्य केले असून, आपली बदनामी करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला होता.

ऑक्टोबर 2021 मध्ये समीर वानखेडेंनी मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केली होती. मात्र नंतर आर्यन खान यांना या प्रकरणात ड्रग्सच्या आरोपांतून मुक्त करण्यात आले. याच घटनेशी मिळतीजुळती कथा सीरिजमध्ये दाखवण्यात आल्याने आपण बदनाम झाल्याचा दावा करत वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती.

या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार यांच्या एकल खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणाची सुनावणी करण्याचा अधिकार (ज्युरिस्डिक्शन) दिल्ली उच्च न्यायालयाकडे नाही. न्यायालयाने सांगितले की, हा वाद केवळ मुंबईतील न्यायालयांमध्येच ऐकला जाऊ शकतो. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.