Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार एकाच दिवशी राज्यसभेतून होणार निवृत्त

शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार एकाच दिवशी राज्यसभेतून होणार निवृत्त

नवी दिल्ली : खरा पंचनामा

२०२५ हे वर्ष राजकीय घडामोडी पाहता अत्यंत महत्वाचे वर्ष ठरले आहे. आता २०२६ हे नवीन वर्ष सुरू झाले असून, या वर्षात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकांकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. दुसरीकडे राज्यसभेतील 245 खासदारांपैकी ७१ खासदारांचा कार्यकाळ याच वर्षात संपणार असून ते निवृत्त होणार आहेत. या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील मोठं नाव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील यामध्ये समावेश असून, त्यांच्यासह महाराष्ट्रातील सात खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. विशेष म्हणजे सातही राज्यसभेचे खासदार २ एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणार आहेत.

राज्यसभेतून निवृत्त होणारे खासदार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा समावेश असून, याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या खासदार डॉ. फौजिया खान हे सर्वजण एकाच दिवशी राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

71 खासदारांमध्ये खासदारांमध्ये मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत. भाजपचे सर्वाधिक 30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा देखील समावेश आहे.

याशिवाय झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन, गुजरातमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तीसिंह गोहिल, तेलंगणातील काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, लोकसभेचे माजी उपसभापती थंबी दुराई आणि द्रमुक नेते तिरुची शिवा हेही राज्यसभेच्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.

राज्यसभेत देशाचे राष्ट्रपती यांच्या नामनिर्देशित कोट्यातून खासदारांची नियुक्त करण्यात येते. यामध्ये माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा कार्यकाळ देखील मार्च २०२६ मध्ये संपणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेतील निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या जागी राज्यसभेत कोण कोणाची खासदार म्हणून वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का? याकडे देखील लक्ष असणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.