Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बोगस मतदान कार्ड्सचा ढीग, EVM मध्ये बिघाड विविध ठिकाणी मतदानातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

बोगस मतदान कार्ड्सचा ढीग, EVM मध्ये बिघाड 
विविध ठिकाणी मतदानातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर

मुंबई : खरा पंचनामा

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज 15 जानेवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

अशातच मालेगावातून एक धक्कदायक बाब समोर आली आहे. मालेगावात एकाच ठिकाणी ८०० हून अधिक मतदान कार्ड सापडल्याच प्रकार समोर आला आहे. हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. पोलिसांनी हे कार्ड जप्त करून त्याचा पंचनामा सुरू केला आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशीही सुरू केली आहे.

पिंपरीत मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा आरोप करत एका महिलेने चांगलाच राडा घातला. इतकेच नव्हे तर तिने निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची गाडी देखील रोखून धरली. पिंपरी चिंचवडमधील मतदान केंद्रावर मतदार यादीत नाव नाहीत मतदार याद्या व्यवस्थित नाहीत, उमेदवाराला न विचारता EVM मशीन वरील स्टिकर निवडणूक विभागाने काढून टाकले, बदलले, असा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचे नातेवाईक विद्या जवळकर यांच्याकडून करण्यात आला आहे. या सर्व आक्षेपांबाबत जवळकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे त्यांनी थेट मतदान केंद्रावरच राडा घालत निवडणूक आयोगाची गाडी रोखली.

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालय मतदान केंद्रावर आज बोगस मतदानाच्या संशयावरून मोठा गदारोळ झाला. प्रभाग क्रमांक पाचमध्ये अपक्ष उमेदवार अॅड. पियुष पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. याचदरम्यान अॅड. पियुष पाटील यांनी सकाळपासूनच केंद्रावर संशयास्पद मतदार येत असल्याचा आरोप केला. त्यांच्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी ४० ते ४५ मतदारांकडे ओळखपत्रांची मागणी केली. मात्र, आवश्यक पुरावे सादर न करू शकल्याने या मतदारांना मतदान न करताच परत जावे लागले.

अकोला महापालिकेतील प्रभाग १७ मध्ये भांडपुरा चौकातील महापालिकेच्या उर्दू कन्या शाळेत जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अकोल्यात मतदान केंद्रावरच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झाले. सकाळपासून या मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. अचानक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. पण पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात मतदान यंत्रावरील बटणे काम करत नसल्याने उमेदवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 15 मध्ये हा सगळा प्रकार घडला. आधीच मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यातच हा घोळ झाल्याने आम्ही अजून किती वेळ रांगेत उभे राहायचे असा सवाल मतदारांकडून उपस्थित करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.