बसस्थानकातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या जयसिंगपूरच्या महिलेस अटक
3.12 लाखांचे मंगळसूत्र जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी एसटी बसस्थानकातील गर्दीत दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली. तिच्याकडून चोरीचे ३ लाख १२ हजार रुपयांचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले. सांगली एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
शारदा बंटी हतळगी (वय ४०, रा. जयसिंगपूर, ता. शिरोळ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. अरुणा राजाराम सूर्यवंशी (वय ६७, रा. गोंदी, ता. कराड) या दि. १ फेब्रुवारी रोजी खरसुंडी (ता. आटपाडी) येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या दरम्यान खरसुंडी बसस्थानकावर थांबल्या होत्या. बस आल्यानंतर त्या बसमध्ये चढत असताना गर्दी झाली होती. तेव्हा गर्दीचा फायदा घेत शारदा हतळगी या महिलेने सूर्यवंशी यांच्या गळ्यातील पावणेचार तोळ्याचे मंगळसूत्र लंपास केले. काही वेळाने सूर्यवंशी यांना हा प्रकार निदर्शनास आला. सर्वत्र शोध घेऊन मंगळसूत्र मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दि. २ फेब्रुवारी रोजी आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकास बसस्थानकावर चोरी करणाऱ्या संशयितांची माहिती काढून कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकातील अंमलदार हणमंत लोहार, सुनील जाधव यांना संशयित महिला शारदा हतळगी हिने खरसुंडी बसस्थानकावर मंगळसूत्र चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिला चौकशीसाठी बोलवले. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यानंतर तिने खरसुंडी बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. तिच्याकडून ते जप्त केले. तिला आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.