400 कोटींच्या कंटेनर लुटीचा 'मास्टरमाईंड' अखेर शरण; किशोर सावळा नाशिक पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : खरा पंचनामा
कर्नाटकातील चोर्ला घाट (ता. खानापूर, जि. बेळगाव) चारशे कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरच्या लुटीप्रकरणातील मुख्य संशयित व सूत्रधार किशोर सावळा अखेर शनिवारी (ता. ३१) दुपारी नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला. त्यामुळे यापूर्वी अटकेत असलेल्या सहा आरोपींसह आता या गुन्ह्याची संपूर्ण साखळी उलगडण्याची शक्यता बळावली आहे.
१६ ऑक्टोबरच्या रात्री कर्नाटकात घडलेली ही लूट, घोटी-नाशिक मार्गावर झालेल्या संदीप पाटील यांच्या अपहरणातून उघडकीस आली होती. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात पाटील यांनी तक्रार दाखल करत फोन रेकॉर्डिंगसह सविस्तर माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर नऊ जानेवारी रोजी घोटी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यात मच्छिंद्र मढवी याची आरोपी म्हणून भर पडली. अलीकडील सुनावणीत विराट गांधी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून मढवी याची पोलिस कोठडी वाढवण्यात आली आहे.
तपासातील विविध वळणांमुळे किशोर सावळा लवकरच पोलिसांसमोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. काही पोलिस पथके त्याच्या शोधात अपयशी ठरली असतानाच सावळा याने स्वतःहून शरण येत तपासाला नवे वळण दिले आहे.
संपूर्ण घटना कर्नाटकात घडली असली, तरी नाशिकमधील अपहरण प्रकरणातूनच हा गुन्हा उघडकीस आल्याने कर्नाटक गृह खात्याचेही या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी कर्नाटक पोलिस अधिकाऱ्यांना अपेक्षित कागदपत्रे न मिळाल्याची चर्चा होती. मात्र, आता मुख्य संशयित ताब्यात आल्याने अनेक संशयाचे कंगोरे ठळक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून असून एसआयटी प्रमुखांशी वरिष्ठ पातळीवर सातत्याने चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. कर्नाटकच्या राजकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणात आणखी आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.