Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

60 हजारांची लाच घेताना एपीआयसह खासगी व्यक्तीला अटकगुन्ह्यात मदतीसह हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी घेतले पैसे : सांगली एसीबीची कारवाई

60 हजारांची लाच घेताना एपीआयसह खासगी व्यक्तीला अटक
गुन्ह्यात मदतीसह हद्दपार प्रस्ताव रद्द करण्यासाठी घेतले पैसे : सांगली एसीबीची कारवाई 

सांगली : खरा पंचनामा 

दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जमिनाबाबत न्यायालयात सकारात्मक रिपोर्ट पाठवण्यासाठी तसेच हद्दपारीचा प्रस्ताव प्रांत अधिकाऱ्यांकडे न पाठवण्यासाठी 60 हजारांची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील एपीआयसह खासगी व्यक्तीला रंगेहात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याची माहिती सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.

एपीआय सुनिल शिवाजी गुरव (वय ४०, रा. वृंदावन बंगला, विवेकानंद कॉलनी, मिरज, जि. सांगली), खासगी व्यक्ती जयवंत ईश्वर नागरगोजे (वय ५४, रा. नागरगोजेवाडी, बेडग, ता. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार यांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात मंजूर असलेला अटक पूर्व जामीन नामंजुर करण्यासाठी न्यायालयात पाठवलेल्या अहवालामध्ये मदत करण्यासाठी व प्रांताधिकारी मिरज यांचेकडे पाठविलेल्या हद्दपारी प्रस्तावाची अंमल बजावणी न करता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी 80 हजार रुपयांची लाच एपीआय गुरव आणि नागरगोजे यांनी तक्रारदाराकडे मागितली होती. तसेच नागरगोजे याने कामाची हमी घेतली होती. याबाबत तक्रारदाराने सांगली एसीबीकडे तक्रार दिली होती.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यावर दोघांनी 80 हजारांची लाच मागून तडजोडीनंतर 60 हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीच्या पथकाने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर सापळा रचला. एपीआय गुरव आणि नागरगोजे यांना पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, निरीक्षक, किशोरकुमार खाडे, प्रितम चौगुले, अजित पाटील, ऋषिकेश बडणीकर, पोपट पाटील, सलीम मकानदार, उमेश जाधव, धनंजय खाडे, सुदर्शन पाटील, चंद्रकांत जाधव, अमर शेस्वरे, सागर नायकवडी, सीमा माने, विणा जाधव, चालक विठ्ठल रजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.