Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईला जाण्यापूर्वी अजित पवारांच्या अंत्यस्थळी शरद पवारांची अचानक भेट

मुंबईला जाण्यापूर्वी अजित पवारांच्या अंत्यस्थळी शरद पवारांची अचानक भेट

बारामती : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला पाच दिवस उलटल्यानंतर बारामती आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी घडामोडींना वेग आला आहे. शोकाकुल वातावरणातच राजकीय आणि कौटुंबिक पातळीवर महत्त्वाच्या हालचाली घडताना दिसत आहेत.

रविवारी सकाळी मुंबईला रवाना होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात भेट दिली. याच ठिकाणी अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. अंत्यस्थळी पोहोचल्यानंतर शरद पवार आणि प्रतिभा पवार काही काळ थांबले. दोघेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवार यांच्या प्रस्तावित स्मृतीस्थळाबाबत सविस्तर चर्चा केली.

या भेटीला विशेष महत्त्व यासाठी आहे की, याच काळात मुंबईत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेता आणि पक्षनेता म्हणून निवड होत होती. शरद पवार यांनी "या शपथविधीबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती," असं सांगितल्यानंतर बारामतीतील पवार कुटुंबीयांची तातडीची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार यांच्यासह कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते. या चर्चेनंतरच संध्याकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला.

दरम्यान, अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाबाबत मोठी घोषणा समोर आली आहे. किरण गुजर यांनी सांगितलं की, "अजित दादांचं स्मारक भव्य आणि अर्थपूर्ण व्हावं, अशी शरद पवार यांची स्पष्ट इच्छा आहे." बारामतीत आधीच विविध संकल्पनांवर आधारित वास्तू उभ्या राहिल्या असून, अजित पवार यांचं स्मारकही राज्यभरातील नामवंत वास्तुविशारदांच्या संकल्पनांमधून साकारण्यात येणार आहे.

या घडामोडी केवळ भावनिक नाहीत, तर त्यांचे राजकीय आणि सामाजिक पडसादही दूरवर उमटणारे आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाचा वारसा, पवार कुटुंबातील भूमिका आणि राष्ट्रवादीतील पुढील दिशा- या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील हे निर्णय राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.