Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये बाथरूम क्लिनरयुक्त तुपाचा वापरमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूचा दावा

तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये बाथरूम क्लिनरयुक्त तुपाचा वापर
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूचा दावा

कुर्नूल : खरा पंचनामा

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती वेंकटेश्वर मंदिराच्या लाडूंमध्ये (प्रसाद) मागील सरकारच्या काळात भेसळयुक्त तुपाचा वापर करण्यात आल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

हे तूप चक्क बाथरूम साफ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलपासून तयार करण्यात आले होते, असा खळबळजनक दावा नायडू यांनी केल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

कुर्नूल जिल्ह्यातील येम्मिगनूर येथे शेतकऱ्यांना जमिनीच्या पासबुक वाटप कार्यक्रमादरम्यान नायडू बोलत होते. यावेळी त्यांनी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर कडाडून टीका केली. "गेल्या पाच वर्षांत वायएसआरसीपी सरकारने श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराची पवित्रता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रसादासाठी वापरले जाणारे तूप हे रासायनिक प्रक्रियेतून बनवलेले होते. धक्कादायक म्हणजे यात बाथरूम क्लिनरमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांचा समावेश होता," असे मुख्यमंत्री म्हणाले.

टीटीडीच्या (तिरुमला तिरुपती देवस्थानम) माजी अध्यक्षांनीही या भेसळीबाबत कबुली दिल्याचे नायडू यांनी सांगितले. आम्ही सत्तेत आल्यानंतर ही परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलली असून, आताच्या लाडूंची चव आणि गुणवत्ता पूर्वीच्या तुलनेत पूर्णपणे वेगळी आणि शुद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर जमिनीच्या नोंदींमध्ये फेरफार केल्याचा आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. "शेतकऱ्यांच्या जमिनींच्या पासबुकवर स्वतःचे फोटो छापण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? या कामासाठी त्यांनी जनतेचे ७०० कोटी रुपये खर्च केले," असा टोलाही त्यांनी लगावला.

जमीन हडपण्याचे प्रकार रोखण्यासाठी तेलुगू देशम पक्षाचे सरकार सुरक्षा फीचर्ससह नवीन पासबुक जारी करत आहे. एप्रिलपर्यंत १८ लाख शेतकऱ्यांना ही पुस्तके वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्यांना थेट तुरुंगात पाठवले जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.