महापालिकेत नमाज पठण भोवले !
सात जणांवर अटकेची टांगती तलवार
मालेगाव : खरा पंचनामा
येथील महापालिकेच्या विद्युत विभागात सामुहिक नमाज पठण करणे संबंधित कार्यकर्त्यांच्या अंगलट आले आहे. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी सात जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या सर्व संशयीतांवर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
मालेगावातील 'लोक संघर्ष समिती' या संघटनेने शहरात बंद पथदीप सुरू करण्यासाठी महापालिकेकडे मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून दाद मिळत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीची भावना आहे. याच संदर्भात समितीचे कार्यकर्ते गेल्या सोमवारी महापालिकेत गेले. तिथे विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात ते गेले. मात्र अधीक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने संबंधित कार्यकर्ते त्यांच्या दालनातच थांबून राहिले. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने आणि सायंकाळी ६ वाजता नमाजाची वेळ झाल्यावर कार्यकर्त्यांनी अधीक्षकांच्या दालनातच नमाज पठण सुरू केले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर शहरात खळबळ उडाली.
महापालिकेत नमाज पठण करण्याच्या प्रकाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सकल हिंदू समाजातर्फे महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्या दालनात हनुमान चालीसाचे पठण करून नमाज पठणाला प्रत्युत्तर देण्यात आले. यामुळे शहराचे वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, विद्युत अधीक्षकांच्या कार्यालयात सामूहिक नमाज पठण करण्याच्या प्रकाराची महापालिका व पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली. विद्युत विभागातील कर्मचारी महेंद्र सावंत यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार लुकमान कमाल, सलीम एक्का व अन्य पाच जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आपण कर्तव्यावर असताना संशयीत इसम कार्यालयात आले आणि 'तेरे साहब किधर गये है, तू गोडाऊन किपर है ना, तो लाईट का इसाब दे, असे म्हणत त्यांनी विद्युत अधीक्षकांच्या दालनात प्रवेश करून खुर्चा फेकत सामूहिक नमाज पठण केले. तसेच त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी दमदाटी व धक्काबुक्की केली' असे सावंत यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे, शहरात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस. बी. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.