अनिकेत कोथळेच्या मृत्यूला कामटेसह साथीदारच जबाबदार
कोथळे खून प्रकरण : ॲड. उज्ज्वल निकम यांच्या अंतिम युक्तीवादास सुरुवात
सांगली : खरा पंचनामा
बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला. त्याला कामटेसह साथीदार जबाबदार आहेत, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज जिल्हा न्यायालयासमोर केला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात आजपासून अंतिम युक्तीवादास सुरुवात झाली. त्यात ॲड. निकम यांनी घटनाक्रम, गुन्हा लपवण्याचा प्रयत्न आणि पुरावे याविषयी न्यायालयासमोर युक्तीवाद केला. पुढील दोन दिवस हा युक्तीवाद होणार आहे.
६ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांना बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी अमानुष मारहाण केली. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला. त्याला जबाबदार हे सारे आहेत, असा युक्तीवाद ॲड. निकम यांनी सरकारतर्फे करत तीन भागांत वर्गीकरण केले.
पहिल्या भागात हा गुन्हा उघडकीस कसा आला हे न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर दुसऱ्या भागात हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित कामटे व साथीदारांनी कसे प्रयत्न केले हे सांगण्यात आले. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी काही वाक्यांवर आक्षेप नोंदवला. त्याला ॲड. निकम यांनी फेटाळून लावले.
त्यानंतर तिसऱ्या भागात अनिकेत कोथळे याच्या मृतदेहाचे अवशेष त्याचेच आहेत, हे न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून न्यायालयात सिद्ध करण्यात आले. त्या संदर्भातील जंत्री आज न्यायालयासमोर देण्यात आली. त्यानंतर तीन मुद्द्यांवर आज पुन्हा ॲड. निकम यांनी प्रतिपादन केले. त्यात हा गुन्हा कसा उघडकीस आला, गुन्हा लपवण्यासाठी दोघेजण पळून गेल्याची काल्पनिक कथा कामटेने कशी रचली आणि प्रत्यक्ष साक्षीदार अमोल भंडारे याच्यावर कसे दडपण टाकले होते, याची सविस्तर माहिती तपास अधिकारी राजन माने, तत्कालीन उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्या पुराव्याचा युक्तीवाद करण्यात आला. पुढील दोन दिवसांत आणखी युक्तीवाद केला जाणार आहे.
सीआयडीच्या अधीक्षक श्रीमती देसाई, अपर पोलिस अधीक्षक विजय तामाणे, उपाधीक्षक प्रमोद नलवडे, मुख्य तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकार पक्षाला मदत केली. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांना न्यायालयात आणण्यात आले होते. यातील आणखी एक संशयित अरुण टोणे याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे.
सीआयडीचा योग्य तपास
बचाव पक्षाच्या वकिलांनी निरीक्षक राजन माने आणि उपनिरीक्षक रोहित चौधरी यांचा उलटतपास घेतला होता. त्यात साक्षीदार वेळेत का तपासले नाहीत, या अनुषंगाने उलटतपासणी केली होती. त्या सर्व मुद्द्यांवर ॲड. निकम यांनी जोरदार युक्तीवाद केला. सीआयडीने योग्य पद्धतीने तपास केला असून त्या बाबतची माहिती न्यायालयासमोर पुराव्यानिशी सादर केली.
सलग ११० मिनिटे युक्तीवाद
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज सलग ११० मिनिटे अंतिम युक्तीवाद केला. यावेळी नवोदित वकिलांसह न्यायालय पूर्णतः भरले होते. ॲड. निकम यांनी मांडलेले मुद्दे प्रत्येकजण बारकाईने ऐकत होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.