"जमीन घोटाळ्यात राऊत कारागृहात राहून आलेत."
नागपूर : खरा पंचनामा
शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत हे जमीन घोटाळ्यात कारागृहात राहून आले आहेत. ते हे विसरले असतील, लोक विसरले नाहीत. त्यांच्याकडे असलेल्या सर्व चित्रफिती त्यांनी दाखवाव्या, त्यावर चोख उत्तर दिले जाईल, असा प्रतिहल्ला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नागपूर येथे केला.
पर्यावरण संसद या कार्यक्रमासाठी नार्वेकर नागपूरमध्ये आले होते, त्यावेळी ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. अलिबाग प्रकरणामध्ये राऊत यांनी त्यांच्याकडे आणखीही चित्रफित असल्याचा दावा करीत नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याकडे नार्वेकर यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्यांना अफवा पसरवायला आवडतात.
अलिबागमध्ये दीडशे वर्षापासून आमच्या कुटुबांचे वास्तव आहे. मी अलिबागला वारंवार जात असतो. तेथे माझी शेती आहे. घटनेच्या दिवशी दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला. त्यावेळेला तिकडे मारामारी होत होती. म्हणून मी तिकडे गेलो व शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या जागेशी माझे काही देणे घेणे नाही.
मी राजीनामा द्यावा, अशी राऊत यांची जुनी इच्छा आहे. त्यामुळे ते कोणता ना कोणता आरोप करून राजीनाम्याची मागणी करतात. त्यांनी जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे आहेत. संजय राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये राहून आलेले आहेत. हे लोक ते विसरले नाहीत, त्यांच्याकडे असलेल्या सर्व चित्रफिती त्यांनी दाखवाव्यात, त्यावर चोख उत्तर दिले जाईल, असे नार्वेकर म्हणाले.
भारताचे संविधान हे विश्वातले सर्वात उत्कृष्ट आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारे वादग्रस्त बोलणे उचित नाही. कुणालाही याबाबत अधिक माहिती द्यायची असेल, बोलायचे असेल तर लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा टोला त्यांनी एमआयएमचे वारिस पठाण यांना लगावला.
नागपुरातील नवीन विधान भवनाच्या इमारतीसाठी आवश्यक सर्वच विभागाकडून परवानगी मिळाल्या आहेत. प्रशासकीय मान्यताही मिळाली असून आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे. लवकरच काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.