दादांच्या जाण्यानंतर बैठक बोलवणं गरजेचंच; जबाबदारी घेतली म्हणून 'व्हिलन' कसे?
कोल्हापूर : खरा पंचनामा
दादांच्या अचानक निधनानंतर पक्षाची बैठक कोणी बोलवायची, असा सवाल उपस्थित करत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफयांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष असताना त्यांनी जबाबदारीने पुढाकार घेतला, तर त्यांना व्हिलन ठरवणं चुकीचं असल्याचं मुश्रीफ म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे इतरांनी त्यात लुडबुड करण्याची गरज नाही. आम्ही दुःखात असताना विनाकारण टीका का केली जाते, हा प्रश्न आहे. ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निष्णानंतर जे घडलं ते सत्य मी मांडलं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अपघातानंतर कुटुंबीयांची इच्छा होती की सुनेत्रा वहिनींचा शपथविधी लवकरात लवकर व्हावा. पवार घराणे पुरोगामी असल्याने तिसऱ्या दिवसाचे विधी आटोपल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
विलीनीकरणाच्या चर्चाबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की, 'या चर्चामध्ये फक्त अजित दादा सहभागी होते. आम्ही प्रमुख नेते त्यात नव्हतो, हा आमचा स्पष्ट दावा आहे. जर सुनेत्रा वहिनी, कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते एकत्रीकरणाच्या बाजूने असतील, तर त्यात अडचण येण्याचं कारण नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तीच माझी भूमिका असेल.' अपघाताच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने चौकशी सुरू केली असून, सापडलेल्या 'ब्लॅक बॉक्स'मधून संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी चौकशी हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित दादांच्या जाण्याने मतदार आणि कार्यकर्त्यांना मोठा चटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पश्चिम महाराष्ट्रात भक्कमपणे विस्तारलेला असून, येणाऱ्या निवडणुकीत मतदार अजित दादांबद्दल सहानुभूती दाखवतील, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला. दहा वर्षांनंतर जिल्हा परिषदेसाठी मतदान होत असल्याने मतदार आणि उमेदवारांमध्ये प्रचंड उत्साह असून, या निमित्ताने जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा लोकशाहीची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.