वडिलांचा खून करणाऱ्या मुलास आजन्म कारावासाची शिक्षा
सांगली : खरा पंचनामा
गावाला जाण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून वडिलांचा खून करणाऱ्या मुलास आजन्म कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच दहा हजार रुपये दंड व दंड नाही दिल्यास सहा महिने सश्रम कारवासाची शिक्षा सांगली येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. एम. एस. काकडे यांनी सुनावली. याकामी सरकापक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता श्रीमती. मेघा प्रवीण पाटील यांनी काम पाहिले.
प्रवीण देवाप्पा मोडे (वय २६, रा. आसंगी, ता. जत,) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी हे नात्याने आई-मुलगा असुन मयत हा आरोपीचे वडील आहेत. प्रविण यास बाहेर गावी जाण्यासाठी त्याला यातील (मयत) देवाप्पा
खिराप्पा मोडे (वय ५५) यांनी पैसे न दिल्याचा राग मनात धरुन त्याने देवाप्पा खिराप्पा मोडे यांचे छातीवर डावे बाजुस व डाव्या बरकडीवर तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी करुन त्यांचा खुन केला होता. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल आज न्या. श्रीमती काकडे यांनी दिला.
याकामी सरकारपक्षातर्फे फिर्यादी (प्रत्यक्षदर्शी साक्षीदार), तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एन. बी. दांडगे यांच्या साक्षी न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपी प्रवीण याला वरीलप्रमाणे शिक्षा दिली आहे. या खटल्यात उमदी पोलीस ठाणेचे शिवाजी पांडूरंग माळी, पैरवी कक्षातील उपनिरीक्षक अशोक तुराई आणि श्रीमती वंदना मिसाळ यांनी मदत केली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलीसांचे सहकार्य मिळाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.