मला झहीरकडे नाही, आईकडे जायचंय!
भिगवणच्या तरुणीची अखेर घरवापसी
इंदापूर : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील ज्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता, त्या प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रियकरासोबत राहण्याचा हट्ट धरणारी ती तरुणी अखेर आपल्या कुटुंबाकडे परतली आहे. "मला माझ्या आई आणि मामाकडे जायचे आहे," अशी स्पष्ट इच्छा तरुणीने इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर व्यक्त केली, त्यानंतर न्यायालयाने तिचा ताबा पालकांकडे देण्याचे आदेश दिले आहेत.
तरुणीचे लग्न अवघ्या दोन दिवसांवर असताना, लग्नाची खरेदी करून घरी परतत असताना तिचे अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मुलीला पळवून नेल्याचा दावा केल्याने भिगवणमध्ये हिंदूत्ववादी संघटनांनी रस्ते रोखून धरले होते. मात्र, काही दिवसांनी समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये तरुणीने, "माझे अपहरण झाले नसून मी स्वमर्जीने जहीर शेखसोबत आले आहे," असे सांगितले होते.
20 फेब्रुवारी रोजी बारामती न्यायालयात तरुणीने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. कायद्यानुसार ती सज्ञान असल्याने कोर्टाने तिला कोणा एकाच्या ताब्यात न देता सुधारगृहात पाठवले होते. काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत जेव्हा न्यायाधीशांनी तिला पुन्हा विचारले, तेव्हा तिने कोणताही दबाव न ठेवता आई आणि मामाकडे जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, झहीर आणि त्याच्या भावाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तरुणीने सुनावणी दरम्यानही अपहरण झाल्याचे सांगितले नाही. तरुणीला तिच्या घरी पाठवण्याचे आदेश देण्यात आले असून अपहरण करण्यात आले होते कि, सोबत येण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता? नेमकं काय घडलं होत याचा तपास अद्यापही पोलिस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.