Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

पुणे : खरा पंचनामा 

पुण्यातील काँग्रेस भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आल्याचा प्रकार घडला आहे. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनावर दगडफेक केली, यावेळी एक महिला पोलिस कर्मचारी आणि काँग्रेस कार्यकर्ता जखमी झाल्याची माहिती आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पोलिसांसमोरच ही दगडफेक झाल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या कार्यालयीन कक्षात टिपू सुलतानाची प्रतिमा लावण्यात आल्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर बोलताना सपकाळ म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर टिपू सुलतान याने इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला. टिपू सुलतान एक शौर्य गाजवणारा योद्धा होता.

शौर्याचे लक्षण म्हणून टिपु सुलतान याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघायला पाहिजे, असे सपकाळ म्हणाले होते, त्यावरून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

हर्षवर्धन सपकाळांविरोधात काँग्रेस भवनासमोर भाजपने आंदोलन सुरू करत हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. काँग्रेस भवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जवळपास दीड ते दोन तास जोरदार निदर्शने केली. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीतून दगडफेक सुरू झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात होता. गर्दीतून कुणीतरी जोरदार दगड भिरकावल्याने एक महिला पोलिस कर्मचारी जखमी झाली. त्यानंतर काँग्रेसचा कार्यकर्त्यालाही दगड लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच, परिसरातील काही वाहनांनाही दगडफेकीचा फटका बसला आहे.

तर काँग्रेसकडूनही दगडफेक झाल्याचा आरोप भाजप आंदोलकांकडून करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच दगडफेक करण्यास सुरुवात केल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, पोलिसांसह तीन पत्रकारदेखील यात जखमी झाले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंना अटक करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

काँग्रेस कार्यकर्त्याचे डोके फुटल्याचे समजताच आणि काँग्रेस गोटातूनही आक्रमक प्रत्युत्तर मिळायला लागताच, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोरून काढता पाय घेतला. या घटनेनंतर काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते प्रचंड संतापले असून त्यांनी भाजपच्या या कृत्याचा निषेध केला आहे. परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जखमी कार्यकर्त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.