Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आपुल्या घरात हाल सोसते मराठी'मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी

'आपुल्या घरात हाल सोसते मराठी'
मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी

मुंबई : खरा पंचनामा 

मराठीतील आद्यकवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मराठी भाषा गौरव दिन सादरा करण्यात येतो. मराठीच्या अस्मितेसाठी कुसुमाग्रजांचं योगदान आणि त्यांचे प्रयत्न यासमवेत मराठी साहित्यसंवर्धनासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीवर हा मराठी भाषा गौरव दिन म्हणजे जणू एक कौतुकाची थाप. याच खास दिवसाच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी 2026 रोजी, दरवर्षीप्रमाणंच काही खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं विधीमंडळात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला मात्र आमदारांची दांडी पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 'आपुल्या घरात हाल सोसते मराठी' हेच वाक्य आठवलं. राजधानी मुंबईतील मराठी भाषा कार्यक्रमाबाबत आमदारांची मात्र अनास्था हा चर्चेचाच विषय ठरला.

सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमांचं आमंत्रण असतानाही 90 टक्क्यांहून अधिक आमदार कार्यक्रमासाठी गैरहजर असल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख मंत्री यांची उपस्थिती वगळता आमदारांची अनुपस्थिती लक्ष वेधणारी होती.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळं आमदारांनी विधीमंडळाच्या या अधिवेशनात उपस्थित राहणं अनिवार्य आहे. त्याचदरम्यान विधीमंडळात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला असतानाही तिथं मात्र आमदार आणि लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवली. त्यामुळं यामागचं नेमकं कारण काय हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री ही सर्व मंडळी कार्यक्रमासाठी असतानाच आमदार नेमके कोणत्या कामामध्ये व्यग्र आहेत, ज्यामुळं त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यासाठी काही बराच वेळ शिल्लक असतानाच हा कार्यक्रम पार पडत असताना तिथं जाणं मात्र आमदारांनी टाळलं. ज्या मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण केलं, ज्या मराठीवरून मतं मागण्यात आली त्याच मराठी भाषेच्या गौरव दिनी आमदारांची ही कृती सामान्यांच्या भुवया उंचावणारी ठरत आहे.

आदित्य ठाकरेंसह विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांचेही मोठे नेते, तब्बल 90 टक्के आमदारांची अनुपस्थिती ही चिंतेची बाब असून कार्यक्रमाची पूर्वसूचना असूनही आमदारांनी मारलेली दांडी पाहता आता मुख्यमंत्री त्यांना उपदेशाचे बोल सुनावतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या लोकप्रतिनिधींना मराठीच्या मुद्द्यावरूनही जनतेनं मतं दिली, त्याच मराठी भाषेसाठी आयोजित केलेल्या सन्मानार्थ कार्यक्रमाला आमदारांनी दांडी मारणं हे स्वीकारार्ह नाही असे खडे बोल आता जनसामान्यांतून सुनावण्यात येत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.