Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मदतीसाठी आलेल्या तरुणीचा महिला पोलिसानेच केला सौदा!

मदतीसाठी आलेल्या तरुणीचा महिला पोलिसानेच केला सौदा!

पुणे : खरा पंचनामा

महिला सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेणाऱ्या पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानेच मानवतेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. पुण्यातील कुख्यात बुधवार पेठेतून सुटका करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीचा सौदा खुद्द महिला हवालदारानेच केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले असून पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे महिन्याभरापूर्वी एक बांगलादेशी तरुणी मध्यरात्री फरासखाना पोलीस ठाण्यात पोहोचली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला हवालदार मनिषा पुकाळे यांच्याकडे मदतीची याचना केली होती. "माझ्याकडून बुधवार पेठेत जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे, माझी सुटका करा आणि मला वाचवा," असे पीडितेने हवालदाराला सांगितले होते. कायदेशीर कारवाई करून तरुणीला सुधारगृहात पाठवण्याऐवजी, हवालदार पुकाळे यांनी तिला गुपचूप शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले. तिथे त्या तरुणीच्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. दोघांमध्ये काही वेळ संशयास्पद चर्चा झाली आणि त्यानंतर हवालदाराने त्या पीडितेला पुन्हा त्याच नरकात जाण्यास भाग पाडले.

हा प्रकार पुणे पोलिसांच्या वरिष्ठांच्या कानावर गेल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. हवालदार पुकाळे यांनी केवळ कर्तव्यात कसूर केली नाही, तर पोलीस दलाची प्रतिमा प्रचंड मलीन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनिषा पुकाळे यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश जारी केले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.