हिंदी सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने कोथळेला मारले
विशेष सरकारी वकील उज्वल निकम
सांगली : खरा पंचनामा
अनिकेत कोथळे खून प्रकरणात हिंदी सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अनिकेत कोथळेला संशयित आरोपींनी मारले, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयापुढे केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश एस. आर. पडवळ यांच्या कोर्टात चालू आहे. आज सुनावणीचा तिसरा दिवस होता. या सुनावणी वेळी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर तसेच सीआयडीच्या पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आज तिसऱ्या दिवशी पुढे सुरू झाली. यात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यांचा युक्तिवाद पुढे चालू ठेवला. ते म्हणाले अनिल लाड याने वापरलेल्या गाडीचा नंबर सांगितला याशिवाय गाडीच्या मालकीबद्दल सांगितले होते. त्यामुळे त्यावेळची परिस्थिती दाखवते की गाडी त्याचीच होती. यातील साक्षीदार प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी बुधवंत यांनी मृतदेहाचा इनक्वेस्ट पंचनामा केला होता. तसेच पंचांसमोर दोन पिशवीमध्ये जळालेल्या मृतदेहाचे भाग भरून ते सील करून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. दरम्यान यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्याय निवाडे देखील न्यायालयापुढे सादर केले.
६ /११/ २०१७ रोजी सरकारी वकील चौरे यांना संशयित युवराज कामटे यांनी फोन केला होता. त्यावेळी कामटेने रिमांड वेळी त्याच्या हातून एका संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. त्यावेळी कामटेने अनेक वेळा चौरे यांना फोन करून खुनाची कबुली ही दिली होती. धीरज पाटील यांनी कामटेचा मोबाईल जप्त केला होता. याबद्दल कामटेला विचारले असता सर तपासा वेळी त्याने उत्तर देणे टाळले होते. तसेच यासंदर्भात धीरज पाटील यांचा उलट तपास घेण्याचेही टाळले. त्यावेळी बचाव पक्षाने बाजू मांडताना कामटे या घटनेच्या वेळी सांगलीत हजर नव्हता तर त्यावेळी तो मिरजेतील सदभावना हॉल येथे अँकरिंगच्या एका कार्यक्रमासाठी गेला होता. शिवाय कामटेने कोथळेला अटक केली नव्हती अशा पद्धतीने बचाव देखील घेण्यात आला होता. याच्या पृष्ट्यार्थ कामटेने काही फोटो हजर केले होते. ज्यावर कोणत्याही प्रकारच्या तारखेचा उल्लेख नव्हता, शिवाय वायरलेस मेसेज व ड्युटी बटवडा रजिस्टरचा कामटेने बचावासाठी आधार घेतला होता. स्वतःच्या हुशारीने अनेक बक्षीस मिळवले असे कामटेचे म्हणणे आहे पण जी व्यक्ती तेरा वर्षे इथे आहे त्याला सांगली-मिरजेचे अंतर माहित नाही हे शक्य नाही तो न्यायालयात खोटे सांगतो असेही निकम यांनी स्पष्ट केले.
मारुती लोंढे व अमोल भंडारे हे या केसमधील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत असे सांगून घटनादिवशी मारुती लोंढे शेजारील रूम मध्ये हजर होते. ज्या पद्धतीने अनिकेत कोथळेला उलटे टांगून हातपाय बांधून तोंडाला बुरखा घालून मारहाण केली जात होती ते बघून लोंढे यांनी एवढे मारू नका असे कामटेला सांगितले होते पण कामटे म्हणाला तुला काय करायचे तू गप बस असे म्हणून हिंदी सिनेमातील क्रौर्यालाही लाजवेल अशा पद्धतीने अनिकेत कोथळेला मारले, असेही निकम यांनी सांगितले. तसेच पोलीस स्टेशनमध्ये कामटेची एवढी दहशत होती की पीएसआय चव्हाण हे सगळे बघून पळून गेला होता असे सांगितले. ज्या पद्धतीने कामटेने कोथळेला मारहाण केली ते पाहता ही त्याची नैसर्गिक वर्तणूक व स्वभाव होता असे निकम यांनी स्पष्ट केले.
सीआयडीच्या एकूण तपास कामाबद्दल समाधान व्यक्त करीत निकम यांनी सीआयडी च्या तपासाचे भरपूर कौतुक केले व अभिनंदनही केले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या तपासात विलंब झाला हे मान्य करीत निकम म्हणाले केवळ या आधारे सगळीच योग्यता नाकारता येणार नाही. या संदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे देखील न्यायालयात हजर केले.
यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद नलवडे, अमोल ठाकूर यांनी सरकार पक्षाला मदत केली. यावेळी बचाव पक्षातर्फे गिरीश तपकीरे, विकास पाटील, प्रमोद सुतार आदी उपस्थित होते. या खटल्यातील पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.