मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाचे गावाकडचे घर जाळण्याचा प्रयत्न.!
जळगाव : खरा पंचनामा
मुंबईत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांच्या नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील राहत्या घराला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मध्यरात्री घरात असलेल्या त्यांच्या आईच्या सतर्कतेमुळे वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नगरदेवळा येथील राऊळ गल्ली परिसरात पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. राऊळ हे मुंबईत कर्तव्यावर असताना, त्यांच्या घरी आई नंदकोर राऊळ व बहीण किरण राऊळ या दोघी झोपलेल्या होत्या. शनिवारी मध्यरात्री अचानक पेट्रोल आणि धुराचा तीव्र वास येऊ लागल्याने नंदकोर राऊळ यांना जाग आली. सुरुवातीला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा त्यांचा संशय होता. मात्र, दरवाजाकडे लक्ष गेल्यानंतर दरवाजाला लावलेला पडदा जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखत नंदकोर राऊळ यांनी तत्काळ मुलगी किरण राऊळ हिला उठवले. दोघींनीही धैर्य राखत घरात उपलब्ध असलेल्या पाण्याने आगीवर नियंत्रण मिळवले.
काही क्षण उशीर झाला असता आग संपूर्ण घरात पसरून मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. आग आटोक्यात आल्यानंतर दरवाजा उघडून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. यानंतर परिसराची पाहणी केली असता राऊळ यांच्या घराच्या दरवाजासमोर पेट्रोलची बाटली, आगपेटी तसेच पायरीवर वापरलेल्या आगकाड्या आढळून आल्या. त्यामुळे ही घटना अपघाती नसून नियोजनपूर्वक घर जाळण्याचा कट रचण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला. माहिती मिळताच उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांनी मुंबई येथूनच पाचोरा पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
दरम्यान, परिसरातील एका किराणा दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रण तपासले असता दोन अज्ञात इसम विना क्रमांकाची मोटारसायकल गणपती मंदिराजवळ उभी करून राऊळ गल्लीच्या दिशेने जाताना स्पष्टपणे कैद झाले आहेत.
घटनेच्या वेळेशी हे चित्रण जुळत असल्याने पोलिसांनी त्याच दिशेने तपास केंद्रित केला आहे. या प्रकरणी किरण राऊळ यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.