पोलीस भरतीत उत्तेजक इंजेक्शन घेणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात
मिरा रोड : खरा पंचनामा
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैदानी चाचणीत चांगली कामगिरी करण्यासाठी शरीरात इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचणाऱ्या एका उमेदवाराला अंमली पदार्थ तपासणी पथकाने रंगेहात पकडले आहे.
याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद करण्यात आले आहे.
भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात सध्या पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2500 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. पहाटे 5 वाजल्यापासून उमेदवारांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात होता. यादरम्यान, अंमली पदार्थ तपासणी पथकाचे कर्मचारी साध्या वेशात मैदानावर गस्त घालत होते. 100 मीटर धावण्याच्या ट्रॅकसमोर असलेल्या बिस्कीट आणि ग्लुकोजच्या तंबूच्या मागे साहिल शंकर अवघडे (23) रा. बारामती, जि. पुणे हा संशयास्पद हालचाली करताना आढळला.
अधिक निरिक्षण केले असता, तो स्वतःच्या हाताच्या दंडामध्ये इंजेक्शनद्वारे उत्तेजक द्रव्य टोचताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी संबंधित उमेदवाराला ताब्यात घेऊन त्याची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तपासात त्याने उत्तेजक द्रव्याचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.