पोलीस ठाण्यातच भिडले शिपाई आणि पीएसआय!
नागपूर : खरा पंचनामा
भावाला सोबत घेऊन पत्नी कौटुंबिक छळाची तक्रार देण्यासाठी आल्याने पोलीस उपनिरीक्षक पत्नीची तक्रार एकून घेत असताना संतप्त झालेल्या पोलीस शिपायाने गोंधळ घालून पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केला.
ही खळबळजनक घटना लकडगंज पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलिस शिपायाला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत ताब्यात घेण्यात आले आहे.
किरण विश्वनाथ कुकलारे (२८) असे पोलीस उपनिरीक्षकावर हल्ला केल्याने गुन्हा दाखल झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. काही वर्षांपूर्वी किरणला निलंबित करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पुन्हा सेवेत कायम करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्याची पोलिस मुख्यालयात चालक म्हणून नियुक्ती झाली. त्याला काही दिवसांपूर्वीच लकडगंजमधील पोलिस वसाहतीत तैनाती देण्यात आली. दरम्यान, त्याचा पत्नी लक्ष्मी यांच्यासोबत वाद झाला. गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लक्ष्मी या किरणविरुद्ध तक्रार देण्यासाठी लकडगंज पोलिस ठाण्यात आल्या. याबाबत कळताच किरणही तेथे पोहोचला.
पोलीस उपनिरीक्षक भंडारे हे पत्नीची तक्रार नोंदवत असताना किरणने शिवीगाळ करून गोंधळ घालायला सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक भंडारे यांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवीगाळ करीत भंडारे यांच्यावर हल्ला केला. अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.