रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर महापौर व उपमहापौर यांचा विविध संस्था व नागरिकांच्या वतीने सत्कार
सांगली : खरा पंचनामा
सांगली - मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर पदी धीरज सुर्यवंशी व उपमहापौर पदी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा भारतीय जनता पक्ष जैन प्रकोष्ठ सांगली , स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्ट, गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, स्वदेशी औषध उद्योग समूह, गणेशनगर प्रभाग क्र. १५ मधील नागरिक यांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष मा. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या स्वदेशी व्हिलावर हृद्य सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील अण्णा होते.
प्रारंभी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे उपाध्यक्ष प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात नूतन महापौर व उपमहापौर यांच्या सत्काराचे प्रयोजन सांगताना रावसाहेब पाटील म्हणाले, 'महापौर धीरज सुर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांची सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करुन सांगलीच्या विकासासाठी त्यांना एकमुखाने पाठिंबा दिला आहे. विविध संस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करुन त्यांच्या हातून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या हिताचे काम व्हावे. नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रशासन गतीमान करतीलच. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून गणेशनगरात गणेश मंदीर झाले पाहिजे असे सांगितले.
स्वदेशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सागर पाटील, सेक्रेटरी हर्षद पाटील यांनी महापौर धीरज सुर्यवंशी व उपमहापौर गजानन मगदूम यांचा सत्कार केला. रावसाहेब पाटील यांनी जैन प्रकोष्ठचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, मिरज पंचायत समितीवर निवडून आलेले मनोज पाटील आणि कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भाजपा जैन प्रकोष्ठचे विश्वजीत दिगंबरे व नगरसेवक दयानंद खोत व संजय यमगर यांचा सत्कार केला.
गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उपाध्यक्ष सतीश सारडा व सेक्रेटरी प्रमोद शेटे, सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे वतीने विनोद पाटोळे व नितीन खाडीलकर तर सांगली जिल्हा भाजपा जैन प्रकोष्ठच्या वतीने प्रशांत गौंडाजे व मनोज पाटील,स्वदेशी औषध उद्योगातर्फे विपुल पाटील व जगदीश भरमगोंड आणि प्रभाग क्र. १५ गणेशनगर नागरिकांच्या वतीने पापा बागवान व देवदत्त सांगले यांनी महापौर व उपमहापौर यांचा सत्कार केला.
यावेळी महापौर धीरज सुर्यवंशी म्हणाले, 'महापौर म्हणून सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी बिनविरोध निवड करुन कामाची संधी दिली आहे. रोज दोन विभागाच्या बैठका घेऊन प्रशासन गतीमान करणे सुरु आहे. घरपट्टी व पाणीपट्टी विभागाचे काम सुरळीत केले जाईल. गणेशनगरातील गणेश मंदीराचा प्रस्ताव द्या. त्याची पूर्तता केली जाईल. शेरी नाल्याचा प्रश्न सोडवणार आहे. वारणा उद्भव योजनेची अंमलबजावणी करुन स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
उपमहापौर गजानन मगदूम यांनी महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी केले व आभार विनोद पाटोळे यांनी मानले. यावेळी वैभव गुरव, प्रशांत चव्हाण, प्रा. आरबोळे, निकम वकील, शितल पाटील, मदनभाऊ युवा मंचचे शितल लोंढे, जयराज बर्गे, शांतीनाथ कर्वे, अजित आडवाणी, श्रीकांत शिंदे, सुहास पाटील व भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व सदस्य आणि गणेशनगर व प्रभाग क्र. १५ मधील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.