पोलिस भरतीवेळी धावताना सांगलीच्या तरुणाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
शहरात सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान आज (शनिवारी) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लोहमार्ग पोलिस पदासाठी घेतल्या जात असलेल्या शारीरिक चाचणीवेळी धावताना २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. संग्राम शिंदे (वय २३, रा. सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत लोहमार्ग पोलिस भरतीसाठी मैदानी शारीरिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संग्राम शिंदे हा सांगली जिल्ह्यातून सहभागी झाला होता. त्याला १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण करायची होती.
धावण्याची चाचणी पूर्ण करत असताना अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला. ही घटना घडताच तेथे उपस्थित पोलिस कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तात्काळ मदतकार्य सुरू केले. संग्रामला त्वरित रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविण्यात आले.
मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.