'तू खालच्या जातीचा आहेस, तू इथं कसा राहतो तेच बघतो, काही झालं तरी तुझी बदली करणार'
जातिवाचक अपमान, छळ सहन होत नसल्याने पीआयचं थेट महासंचालकांना पत्र
रायगड : खरा पंचनामा
'तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतो तेच बघतो, काही झाले तरी तुझी बदली करणार' हा अपमान, छळ सहन होत नसल्याने पीआयने थेट पोलिस महासंचालकांना पत्र लिहित कुटुंबासह आयुष्य संपवण्याचा इशारा दिल्याने रायगड पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
रायगडच्या महाड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश तडवी यांनी पोलिस महासंचालकांना पत्र लिहित सततच्या जातीवाचक अपमान, छळ आणि मानसिक त्रासामुळे कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याचे म्हटलं आहे. या पत्रात दोन एसपींसह अपर पोलिस अधीक्षकांसह सात अधिकाऱ्यांची नावे असून माझ्यासह कुटुबांच्या आत्महत्येला हेच जबाबदार असतील, असं नमूद केलं आहे.
रमेश तडवी यांची 17 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे ग्रामीण येथून रायगड जिल्ह्यात बदली झाली होती. त्यानंतर 31 जानेवारी 2024 रोजी त्यांची महाड शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी त्यांच्याविरुद्ध खोटा 'कसूरी अहवाल' सादर केल्याने, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांची बदली पुन्हा नियंत्रण कक्षात केली होती. या अन्यायाविरुद्ध तडवी यांनी मॅट (MAT) कोर्टात धाव घेतली. मॅट कोर्टाने बदलीला स्थगिती देऊन त्यांना पुन्हा महाड शहर पोलीस ठाण्यात नियुक्त करण्याचे आदेश दिले. या आदेशाविरोधात पोलीस अधीक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु उच्च न्यायालयाने मॅटचा निकाल कायम ठेवला. शेवटी 10 सप्टेंबर 2025 रोजी ते पुन्हा महाड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून रुजू झाले.
रमेश तडवी यांनी आरोप केला आहे की, ते आदिवासी भिल्ल समाजाचे असल्याने त्यांना 'खालच्या जातीचा' म्हणून हिणवले जात असे. उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी त्यांना "तू खालच्या जातीचा आहेस, तू इथे कसा राहतो तेच बघतो, काही झाले तरी तुझी बदली करणार" अशी धमकी दिल्याचे पत्रात म्हटले आहे. सपोनि जिवन हिंदुराव माने हे जाणूनबुजून बाहेरच्या लोकांसमोर त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांचा अपमान करत असत, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच एलसीबी (LCB) अलिबागचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनीही अनेक वेळा जातीवरून बोलून अपमान केला आणि "आम्ही बघून घेऊ" अशा धमक्या दिल्याचे म्हटलं आहे.
तक्रारीत नावे असलेले अधिकारी :
सोमनाथ घार्गे (तत्कालीन पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग
आंचल दलाल पोलीस अधीक्षक, रायगड अलिबाग
अभिजीत शिवथरे, अपर पोलीस अधीक्षक, रायगड
शंकर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, महाड
सविता गर्जे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन
मिलिंद खोपडे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अलिबाग
जीवन हिंदुराव माने, सपोनि / महाड एमआयडीसी पोलिस ठाणे
शंकर काळे आणि जिवन माने यांनी सध्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे बदनामी करण्यास सुरुवात केली आणि त्यांना सतत मानसिक त्रास दिला, ज्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली असल्याचे रमेश तडवी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात झालेल्या भांडणावरून दोन गुन्हे दाखल झाले होते. एका गुन्ह्यात भारत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आरोपी होता. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी अभिजित शिवथरे, शंकर काळे, मिलिंद खोपडे यांनी बनाव करून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तीन इसमांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे. मात्र, बेकायदेशीर अटक करण्यास नकार दिल्याने त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.