Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"...साहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा !"

"...साहेबांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा !"

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल जाहीरपणे आपली भावना व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दावे-प्रतिदावे रंगले आहेत. अशातच आता सुनेत्रा पवारांनी शरद पवार यांच्याबाबत पहिल्यांदाच भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांच्या संसदीय आणि सार्वजनिक जीवनातील ६० वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासावर सुनेत्रा पवार यांनी एक भावनिक आणि कौतुकास्पद ट्वीट केले असून, यात त्यांनी पवारांना 'प्रेरणा' आणि 'ऊर्जा' देणारे नेतृत्व म्हटले आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आदरणीय श्री. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक व संसदीय जीवनाला आज साठ वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण होत आहे. १९६७ मध्ये सुरू झालेला त्यांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेने आणि निष्ठेने पुढे जात आहे. महाराष्ट्र विधानसभेपासून ते संसद भवनापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने जनतेचा विश्वास संपादन केला आहे."

राजकीय मतभेद आणि सत्तासंघर्ष बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांच्या कार्याचा गौरव केला आहे. या दीर्घ वाटचालीत कार्यकर्त्यांची आणि जनतेची साथ हीच पवारांची ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी, "पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहो," अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांच्या योगदानाबद्दल दिलेली ही पोचपावती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.