Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चोरांनी मंत्र्यांच्या घरांवर दरोडे टाकले पाहिजेत!

चोरांनी मंत्र्यांच्या घरांवर दरोडे टाकले पाहिजेत!

अमरावती : खरा पंचनामा 

शहरातील अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कांतानगर परिसरातील न्यायाधीशांच्या वसाहतीत शनिवारी मध्यरात्रीनंतर धाडसी चोरीची घटना घडली. पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरे फोडण्यात आली.

या घटनेने शहरात खळबळ उडालेली असताना या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली आहे. बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे. चोरांनी न्यायाधीशांच्या घरावर नव्हे, तर मंत्र्यांच्या घरावर दरोडे टाकले पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

बच्चू कडू म्हणाले, न्याय देणारे न्यायाधीशच जर अडचणीत असतील, तर देवाभाऊ तुमची वानरसेना काम केव्हा करणार, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे गृहखात्याचा कारभार आहे. इथे दरोडेखोर खुलेआम फिरत आहेत. कुठलेही एखादे चांगले काम दाखवा, एखादे चांगले तहसील कार्यालय दाखवा. पैसे घेतल्याशिवाय काम करणारा एखादा अधिकारी दाखवा. प्रभू श्रीरामाचे तुम्ही नाव घेता, पण रामराज्याला तुम्ही स्पर्शही केला नाही. न्यायाधीशांच्याच घरी चोरी होत असेल, तर सर्वसामान्य लोकांचे काय?. या राज्यात हिंदू तर 'खतरे मे' आहेच, पण आता न्यायाधीशही 'खतरे मे' आले आहेत. 'बटेंगे तो कटेंगे' म्हणणाऱ्या सरकारच्या राज्यात न्यायाधीशच संकटात सापडले आहेत.

बच्चू कडू मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, तुमचे नाव देवाभाऊ आहे, पण देवासारखे राज्य येणार कधी?, आमच्या तुमच्याकडून बऱ्याच चांगल्या अपेक्षा आहेत. आता तर न्यायाधीशांच्या घरी चोरी करण्याचे धाडस चोरांनी दाखवले. त्यांनी न्यायाधीशांच्या नाही, तर मंत्र्यांच्या घरांवर दरोडे टाकले पाहिजेत. तसेही हे सरकार शेतकऱ्यांच्या घरावर दरोडे टाकतच आहे. आता अमेरिकेतील सोयाबीन, मका, कापूस तुम्ही आयात करणार, हा एकप्रकारचा दरोडाच आहे. न्यायाधीशाच्या घरी चोरी झाली, ही बातमी होऊ शकते. पण, रोज शेतकऱ्यांवर दरोडा पडतो, त्याचे काय?, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

शहरातील कांतानगर पसिरातील शासकीय वसाहतीमधील पाच न्यायाधीशांसह चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरे फोडून मुद्देमाल लांबविण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कांतानगर परिसरात विभागीय आयुक्त ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसह न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या न्यायाधीश व कर्मचाऱ्यांची शासकीय वसाहतसुद्धा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.