मंगल कार्यालयात दागिने चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक
चार लाखांचा मुद्देमाल जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
माधवनगर ते कर्नाळ रस्त्यावरील हुपरी गार्डनमध्ये लग्न समारंभात दागिने चोरणाऱ्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ लाख ५ हजार रूपयांचे दागिने जप्त करण्यात आले. एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
फिरासत फक्रुद्दीन शेख (वय २२, रा. मकान गल्ली, खणभाग, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. हुपरी गार्डन येथे दि. ३ रोजी लग्न समारंभ होता. लग्नाची धामधूम सुरू असतानाच संशयित शेख याने तेथे प्रवेश केला. तेथे शुभम अनिल देसाई (रा. गव्हर्मेंट कॉलनी, विश्रामबाग) यांच्या पत्नीच्या बॅगेतील सोन्याचे तीन तोळ्याचे गंठण त्याने बेमालूमपणे लंपास केले. दुपारी पावणे बारा ते साडे चार या दरम्यान हा प्रकार घडला. दुपारी साडे चारच्या सुमारास देसाई यांना पत्नीच्या बॅगेतील गंठण लंपास झाल्याचे समजताच सर्वत्र शोधाशोध केली. तेव्हा चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत त्यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाला चोरट्याला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पथकाने कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज बघून तपास सुरू केला. तेव्हा त्यांना रेकॉर्डवरील आरोपी फिरासत शेख याचे नाव निष्पन्न झाले. त्याचा माग काढत असतानाच तो चिन्मय पार्कजवळ सोने विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतल्यानंतर सोन्याचे गंठण मिळाले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने हुपरी गार्डनमध्ये लग्न समारंभात चोरी केल्याची कबुली दिली. त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.