'उमरा' यात्रेकरू संकटात; महाराष्ट्रातील 50 हजार भाविक सौदीत अडकले
मुंबई : खरा पंचनामा
आखाती देशांमध्ये अचानक उद्भवलेल्या भीषण युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि इराणमधील मोठ्या राजकीय उलथापालथीमुळे महाराष्ट्रातील मुस्लिम समुदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रमजानच्या पवित्र महिन्यात 'उमरा' या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियात गेलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर संपूर्ण आखाती क्षेत्रात तणाव शिगेला पोहोचला आहे. या अस्थिरतेचा थेट फटका हवाई वाहतुकीला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार, विमानांची उड्डाणे रद्द झाल्यास किंवा हवाई हद्द बंद झाल्यास हे भाविक तिथेच अडकून पडू शकतात.
उमरा यात्रेसाठी कोणतीही केंद्रीकृत सरकारी व्यवस्था नसल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
खाजगी ऑपरेटर्स : राज्यातील ५०० हून अधिक खाजगी ट्रॅव्हल ऑपरेटर्सनी यंदा भाविकांना पाठवले आहे.
मुंबईचे केंद्र : केवळ मुंबईतून १०० हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय आहेत.
माहिती संकलन : अडकलेल्या भाविकांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी जिल्हास्तरावर हालचाली सुरू असून, सोमवारपर्यंत नेमकी आकडेवारी स्पष्ट होईल.
उमरासाठी जाणाऱ्यांमध्ये केवळ श्रीमंत वर्गच नाही, तर आयुष्यभराची पुंजी जमा केलेले मध्यमवर्गीय आणि गरीब भाविकही मोठ्या संख्येने आहेत. जर युद्धामुळे तिथे मुक्काम वाढला, तर हॉटेलचा खर्च आणि खाण्यापिण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. विमानाची तिकिटे महागणे किंवा रद्द होणे यांमुळे या भाविकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
भारतीय दूतावासाशी समन्वयः सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहून भाविकांना तात्पुरता निवारा आणि मदत पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्य सरकारचा हस्तक्षेप : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली जाणार आहे.
विशेष मोहीम : अडकलेल्या यात्रेकरूंना विशेष विमानाने सुखरूप परत आणण्यासाठी केंद्राच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.