Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बनावट रक्त चंदन झाडाचे रेल्वेकडून १ कोटी घेणाऱ्या शेतकऱ्याचं निधन रेल्वेची हाय कोर्टात धाव

बनावट रक्त चंदन झाडाचे रेल्वेकडून १ कोटी घेणाऱ्या शेतकऱ्याचं निधन 
रेल्वेची हाय कोर्टात धाव 

यवतमाळ : खरा पंचनामा 

जिल्ह्यातील खर्शी (ता. पुसद) येथे सापडलेल्या कथित एक कोटी रुपयांच्या 'रक्त चंदन' वृक्षाच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तपासणीत हा वृक्ष प्रत्यक्षात रक्त चंदनाचा नसून 'बिजासाल' असल्याचे स्पष्ट झाले होते.

दरम्यान या वृक्षाच्या मोबदल्यासाठी न्यायालयात लढा देणारे शेतकरी केशव तुकाराम शिंदे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. त्यामुळे आता दिलेल्या मोबदल्याची रक्कम परत मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रयत्न करत आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राजेश वाकोडे यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकेनुसार, शेतकरी केशव शिंदे यांची जमीन वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. त्या जमिनीवर असलेल्या कथित रक्त चंदनाच्या झाडासाठीही मोबदला देण्याची मागणी करण्यात आली होती. शासनाच्या नोंदीत हे झाड चंदन म्हणून नमूद असल्याने न्यायालयाने तात्पुरता मोबदला म्हणून एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यापैकी ५० लाख रुपये शेतकऱ्याला काढण्याची परवानगी देण्यात आली होती.

नंतर वन विभागाच्या मदतीने तपासणी आणि मूल्यांकन करण्यात आले. त्यात संबंधित झाड रक्त चंदनाचे नसून बिजासालाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार झाडाचे मूल्य फक्त १० हजार ९८१ रुपये इतके असल्याचे आढळले. झाड तोडण्याचा खर्च १ हजार २१३ रुपये वजा केल्यानंतर शेतकऱ्याला मिळणारी प्रत्यक्ष रक्कम केवळ ९ हजार ७६८ रुपये इतकी राहते.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने न्यायालयात अर्ज दाखल करून दिलेल्या ५० लाख रुपयांतून वरील रक्कम वजा करून उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयात जमा असलेले आणखी ५० लाख रुपयेही रेल्वेला परत मिळावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकरी केशव शिंदे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी, मुलगा आणि मुलींना या प्रकरणात प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याची विनंती रेल्वेने केली होती. न्यायालयाने ती मान्य केली आहे.

या जमिनीच्या भूसंपादनाशी संबंधित प्रकरण सध्या पुसद येथील कनिष्ठ न्यायालयात प्रलंबित आहे. त्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर रक्कम परत करण्याबाबत निर्णय घेऊ, असा युक्तिवाद शिंदे यांच्या वारसदारांकडून करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.