सातारा झेडपीचा वाद चिघळला!
एकनाथ शिंदेंनी बोलावली मंत्री, आमदारांची तातडीची बैठक
मुंबई : खरा पंचनामा
सातारा झेडपीच्या अध्यक्षपदावरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली असून हा वाद आता चांगलाच चिघळला आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला मंत्री आणि आमदारांनी हजेरी लावली आहे. या बैठकीनंतर या वादावर तोडगा निघणार की काही महत्वाचा राजकीय निर्णय होणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
मंत्री शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, भरत गोगावले, योगेश कदम हे या बैठकीसाठी उपस्थित झाले आहेत. तसंच अर्जुन खोतकर, संतोष बांगर आणि मनिषा कायंदे, सुहास कांदे, अशोक पाटील तसंच मुरजी पटेल आणि सुहास बाबर या आमदारांनी देखील या बैठकीला उपस्थिती लावली असे सुत्रांकडून कळते आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचा ताजा वाद हा मुख्यतः २० मार्च २०२६ रोजी झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीभोवतीचा आहे. ही निवडणूक खूपच नाट्यमय आणि वादग्रस्त ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे २७ जागा होत्या, तर राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) यांच्या मिळून ३५ + जागा होत्या.
तरीही भाजपने प्रिया शिंदे (महेश शिंदे यांच्या पत्नी) यांना अध्यक्ष आणि राजू भोसले यांना उपाध्यक्षपदी निवडून आणले. विजय अवघ्या एक किंवा तीन मतांच्या फरकाने झाला. यासाठी आमदारांची फोडाफोडी, सदस्यांना दडपशाही आणि यासाठी पोलिसांनी मदत केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे दोन सदस्य (अनिल देसाई आणि संदीप मांडवे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले किंवा अडवले, ज्यामुळे ते मतदानापासून दूर राहिले. त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) जखमी झाले. त्यांच्यावर धक्काबुक्कीचा आरोप आहे, तर भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. विरोधकांनी (शिवसेना-NCP) जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि एसपी तुषार दोशी यांच्यावर राजकीय गुलामगिरी आणि भाजपला मदत करण्याचा आरोप केला आहे. यामुळं लोकशाहीचा खून झाल्याचे वर्णन केले जात आहे.
शिवसेनेने भाजपवर लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करत भविष्यातील निवडणुकांमध्ये परिणाम होईल, अशी चेतावणी दिली आहे. काही ठिकाणी अपात्रतेची कारवाई करण्याची धमकीही आहे.
महायुतीतीलच मंत्र्यांमध्ये अर्थात शिवसेनेचे शंभूराज देसाई, मकरंद पाटील विरुद्ध भाजपचे जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामध्ये वाक् युद्ध आणि विवाद सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.