खरातला जमीन विकल्यापासून मुलगाच गायब, वडिलांचा आरोप
पाथर्डी : खरा पंचनामा
नाशिकचा भामटा आणि भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. महिला भाविकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचे अघोरी कृत्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. अत्यंत किळसवाणे प्रकार तो करत असल्याचे समोर आले आहे. लोकांच्या जमिनी त्याने लाटल्या आहेत. दमदाटी करून त्याने जमीन हडपल्याची माहिती समोर येत आहे. त्याला याकामी राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर खरात याने जमीन बळकावून मुलालाच गायब केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. तपास जसा वेगाने पुढे सरकत आहे, तसतसे अनेक भयावह प्रकार समोर येत आहे. त्यामुळे या भामट्याला ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातले. जे मंत्री त्याला भेटले, त्या सर्वांची कसून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
भोंदूबाबा अशोक खरातला जमीन विकली आणि त्या दिवसापासून मुलगा बेपत्ता झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारातील शिवाजी ढगे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मुलावर काय भुरळ घातली माहिती नाही. मात्र मुलाने जमीन विकली त्या दिवसापासून तो बेपत्ता आहे. खरात याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांचे पैसेच दिले नाहीत, असा आरोपही ढगे यांनी केला.
भोंदू बाबा अशोक खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारात कोट्यवधींची जमीन आहे. त्याने सगळ्या जागांना कंपाऊंड केले आहे. अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी यायचा अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. अनेक वेळेस एजंट दीपक लोंढे हा देखील खरात याच्या सोबत असायचा. त्यांनी गावात काही वेळेस दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. खरात याने पाथर्डी शिवारात अनेक व्यवहारात पैसे बुडवल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.