Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार विमान अपघात प्रकरण; रोहित पवारांचा प्रफुल पटेलांना थेट सवाल

अजित पवार विमान अपघात प्रकरण; रोहित पवारांचा प्रफुल पटेलांना थेट सवाल

मुंबई : खरा पंचनामा 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. आता या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी थेट माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल पटेल यांनाच लक्ष्य करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांनी प्रफुल पटेल यांना खळबळजनक सवाल विचारला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मिस्टर प्रफुल पटेल जी, आपणास विनंती आहे की अजितदादांच्या अपघाताला किंवा घातपाताला कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या व्हिएसआर (VSR) कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नाला आपण गेला होतात का?" असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तसेच, "जर आपण त्या लग्नाला उपस्थित असाल, तर त्या कार्यक्रमात आणखी कोणकोणते नेते उपस्थित होते आणि ते कोणत्या पक्षाशी संबंधित होते, हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे," अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

रोहित पवार यांनी याच वेळी प्रफुल पटेल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे आता महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी," असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रफुल पटेल हे देशाचे माजी नागरी उड्डाण मंत्री राहिलेले असल्याने विमान कंपन्या आणि नागरी उड्डाण क्षेत्रातील तांत्रिक बाबींशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी केलेले हे आरोप आणि प्रश्न अत्यंत गंभीर मानले जात आहेत. जय पवार यांनी यापूर्वी आर. के. सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी थेट प्रफुल पटेल यांनाच लक्ष्य केल्याने या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे आता प्रफुल पटेल या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, रोहित पवार सध्या तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार विमान अपघात प्रकरण संसदेत उपस्थित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रोहित पवार यांनी सांगितले की, "महाराष्ट्रातील इतक्या मोठ्या नेत्याला न्याय मिळत नसेल, तर हे गंभीर प्रकरण आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होणार असल्याने सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या विविध पक्षांच्या नेत्यांना भेटून आम्ही हा मुद्दा संसदेत मांडण्याची विनंती करत आहोत."

यावर अरविंद केजरीवाल यांनीही रोहित पवार यांना पाठिंबा दर्शवला असून, "अजित पवार यांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात, त्याला आम्ही साथ देऊ," असे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

या घडामोडींमुळे अजित पवार विमान अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात आणखी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.