चार पोरांना थेट मैदानाबाहेर काढलं !
पोलीस भरतीवेळी केले मोठे कांड
नवी मुंबई : खरा पंचनामा
राज्यभरात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून अनेक उमेदवार मैदानात जिवाचं रान करून परीक्षा देत आहे. पण नवी मुंबई पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शारीरिक चाचणीदरम्यान उत्तेजकता वाढवण्यासाठी इंजेक्शन वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ४ उमेदवारांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली इथं सध्या नवी मुंबई पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. रविवारी उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरू असताना काही उमेदवारांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं पोलिसांनी त्यांची झडती घेतली. तपासणीदरम्यान त्यांच्या अंडरवेअरमध्ये लपवून ठेवलेली इंजेक्शनं पोलिसांना आढळून आली.
ही इंजेक्शनं घेऊन शारीरिक क्षमता आणि उत्तेजकता वाढवून चाचणी देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं समोर आलं. भरती प्रक्रियेत यश मिळवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवला. आकाश पानसरे (वय २९), सुयोग होले (वय २१), सुनील कडुसकर (वय २६) आणि संकेत डोंगरे (वय ३०) अशी आरोपी उमेदवारांची नावं आहेत. यापैकी पानसरे हा जुन्नरचा रहिवासी असून उर्वरित तिघेही अहिल्यानगर येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याआधी सुद्धा काही दिवसांपूर्वी मिरा-भाईंदर इथं पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मैदानी चाचणीपूर्वी उत्तेजक औषधाचे इंजेक्शन घेताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं होतं. बारामती येथील रहिवासी साहिल अवघडे याने शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी इंजेक्शनचा आधार घेतला. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित उमेदवाराला ताब्यात घेतलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या अशा घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत तसेच काही उमेदवारांच्या वाढत्या हलगर्जीपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.